कुटुंबीयांच्या सहभागामुळे आंदोलन गंभीर वळणावर
- पाचव्या दिवशी तणाव
- आरोग्य संचालकांना घेराव
- अनेक संघटनांचा पाठिंबा
पणजी, दि.११ (प्रतिनिधी)
मलेरिया सर्वेक्षकांचे आंदोलन हे सत्यासाठी आहे. दहा ते पंधरा वर्षे काम कंत्राटी पद्धतीवर काम केलेल्या कर्मचार्यांना सेवेत कायम करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आजपर्यंत या कर्मचार्यांवर झाला तेवढा अन्याय बस्स झाला. आता त्यांना सेवेत कायम कराच, असे आवाहन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केले.
गेली दहा ते पंधरा वर्षे आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करणार्या कर्मचार्यांनी आरोग्य संचालनालयासमोर दि. ७ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी पाचव्या दिवशी या कर्मचार्यांचे कुटुंबीयही लहान लहान मुलांसह या उपोषणात सहभागी झाल्यामुळे या ठिकाणी बराच तणाव निर्माण झाला आहे.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज या कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांचीही भेट घेतली. या भेटीत, कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण केले असल्याची माहिती आरोग्य संचालकांनी दिली असल्याचे श्री. पर्रीकर यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. या संदर्भात आजच मुख्य सचिवांशी बोलून सर्व कर्मचार्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना दिले.
विविध संघटनांचा पाठिंबा
दरम्यान, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या मलेरिया कर्मचार्यांना गोव्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. यात शिवसेना, सवेरा, क्रांतीसेना, खाजगी बस संघटना आदींचा समावेश आहे. या संघटनांचे नेते आज सदर ठिकाणी उपस्थित होते. मलेरिया कर्मचार्यांचे कायदा सल्लागार ऍड. सुभाष सावंत यांनी यावेळी संचालकांनी सुचवलेल्या काही जणांना कायम करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला व सर्वांना एकत्रितरीत्या सेवेत कायम करण्याची मागणी केली. दरम्यान, आज संध्याकाळी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी या कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. भाजप प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर हेही या वेळी उपस्थित होते.
मरण आले तरी बेहत्तर...!
जोपर्यंत सर्व ५९ कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याचे लेखी पत्र हातात पडत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील. या दरम्यान, एखाद्याला आपले प्राण गमवावे लागले तरी बेहत्तर, असा कडक इशारा या वेळी या कर्मचार्यांचे प्रमुख प्रेमदास गावकर यांनी दिला.
‘पैसे वाटून घ्या...’
आरोग्यमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वी या कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याचे सोपस्कार करण्याची सूचना आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांना दिली होती. मात्र त्यांनी काहीही हालचाल केली नाही. उलट आज, ‘१२ जणांना सेवेत कायम करतो व इतरांचे नंतर पाहूया; तोपर्यंत पैसे वाटून घ्या’ अशी संतापजनक सूचना केली. अशा असंवेदनशील संचालिकेची पदावरून तात्काळ उचलबांगडी करा, अशी मागणी या वेळी श्री. गावकर यांनी केली.
कंत्राटाचा करार वाढवला
दरम्यान, गेल्या ३१ मार्च रोजी या कर्मचार्यांचे कंत्राट संपले होते.
ते वाढवण्यात आले नव्हते. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या हे कर्मचारी गेले दहा दिवस बेकारच होते. आता आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांचे कंत्राट वाढवण्यात आले असून महिना ३५०० रुपये मिळणारा पगार आता महिना ६६०० रुपये असा वाढवण्यात आला आहे. मात्र आपल्याला पगारवाढ नको तर कायम नोकरीच हवी, अशी मागणी संघटनेने केली आहे. दि. १४ पर्यंत न्याय न मिळाल्यास आरोग्यमंत्र्यांच्या बंगल्यावरच धडक देणार असल्याचे श्री. गावकर यांनी सांगितले.
Tuesday, 12 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment