Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 15 April 2011

आज बसेस ‘बंद!’

सरकार - बसमालक संघर्ष तीव्र

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
राज्यातील खाजगी बसमालकांच्या मागण्या पूर्ण करण्यास वाहतूक खाते तथा सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या बसमालकांनी उद्या दि. १५ रोजी बसेस बंद ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकारने ‘एस्मा’ लागू केलेला असला तरी तो झुगारण्याचा निर्णय बसमालकांनी केल्याने लोकांचे अतोनात हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बसमालकांच्या मागण्यांबाबत आपणास कोणतीही कल्पना नसून या बाबतीत वाहतूकमंत्री व वाहतूक संचालक निर्णय घेतील, अशी ताठर भूमिका मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतल्याने सरकार आणि बसमालक यांच्यातील संघर्ष आज आणखीनच धारदार झाला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा खाजगी बसमालकांनी तीव्र निषेध नोंदवला असून त्यांच्यावर खोटारडेपणाचा आरोपही केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर झाले होते, असे सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानेच उद्या पुकारलेला ‘बंद’ होणारच, असे ते म्हणाले. आज तिसर्‍या दिवशी ताम्हणकर व इतर बसमालकांचे उपोषण सुरूच राहिले.
हिंसक वळणाची शक्यता
दरम्यान, खाजगी बसमालक संघटनेने पुकारलेल्या या ‘बंद’ला सर्वच बसमालकांनी पाठिंबा दिलेला नाही. मेरशी व इतर भागांतील काही बसमालकांनी या ‘बंद’ला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या मालकांतच संघर्ष उत्पन्न झाला असून त्याची परिणती आज सुदीप ताम्हणकर यांच्या बसच्या इंजिनमध्ये साखर घालण्यात झाली. या प्रकारामुळे उद्याच्या बंदला हिंसक वळण लागण्याची शक्यता असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

No comments: