Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 16 April 2011

अखेर गवाणे खाण बंद

• खाण संचालकांना स्थानिकांचा घेराव
• कोणतेही परवाने नसल्याचे सिद्ध


पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
गवाणे सत्तरी येथील चौगुले खाणीला राज्य प्रदूषण मंडळाचे कोणतेही परवाने नसल्याचे आज जनसेवा प्रतिष्ठानने खाण संचालकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर खाण बंद करण्याचे आदेश काढण्यात आले. तसेच, चौगुले खाण व्यवस्थापनाकडे राज्य नियंत्रण मंडळाचे परवाने असल्यास ते सादर करावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
आज सायंकाळी डॉ. क्लॉड आल्वारीस आणि डॉ. दत्ताराम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खाण संचालक अरविंद लोलयेकर यांना घेराव घालण्यात आला. यावेळी येथील स्थानिकांनी संचालक लोलयेकर यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. बेकायदा खाणीला खाण संचालनालय संरक्षण देत असल्याचा आरोप यावेळी संचालकांवर करण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून सदर खाण बेकायदा खनिज उत्खनन करीत आहे. त्यांनी परवान्यासाठी अर्ज केला असला तरी त्यांच्याकडे अद्याप कोणतेही परवाने नाहीत. ५४ हजार चौरस मीटर सरकारी जमीनही त्यांनी बळकावली असून तेथेही खनिज उत्खनन केले जात असल्याचा दावा यावेळी डॉ. आल्वारीस यांनी केला. त्यामुळे या खाणीवर त्वरित बंदी घातली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, जोवर खाण बंदचा आदेश काढला जात नाही तोवर येथून हालणार नाही, अशी भूमिका खाणविरोधी कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर अखेर ही बेकायदा खाण बंद करण्याचे आदेश काढण्यात आले.
तीन वर्षांपासून ही खाण सुरू आहे तर, अजून काही दिवस तुम्ही कळ सोसा, असा सल्ला यावेळी खाण संचालकांनी या लोकांना दिला. तसेच, ती खाण बेकायदा असल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नसून त्याबद्दल आपल्याला अभ्यास करावा लागेल, असा युक्तिवाद श्री. लोलयेकर यांनी करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना बरेच फैलावर घेतले. तीन वषार्ंपासून बेकायदा सुरू असलेल्या खाणीबाबत तुम्ही अजूनही कसला अभ्यास करता, असा प्रश्‍न यावेळी डॉ. देसाई यांनी केला.
या खाणीला स्थानिक आमदारांचे संरक्षण मिळते. त्यामुळे पोलिस स्थानकात तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी विश्‍वेश परब यांनी केला. दरम्यान, खाण संचालनालयाचे वरिष्ठ तंत्रज्ञान साहाय्यक अधिकारी डॉ. फर्नांडिस यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना मोबाईलवर संपर्क साधला असता या खाणीकडे परवाने नसल्याचे उघड झाले.
दरम्यान, गवाणे खाण बंद करण्याचे आदेश काढण्यात आल्याचे वृत्त पसरताच गवाणेवासीयांनी विजय मिरवणूक काढली. यात वाळपईवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments: