Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 April, 2011

भ्रष्टाचारी सरकारने राजीनामा द्यावा - श्रीपाद नाईक

मोन्सेरातविरोधात भाजपचे पणजीत धरणे

पणजी, दि.१३ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांसह सर्व कॉंग्रेसजनांना शिक्षणमंत्री भ्रष्ट असल्याची जाणीव आहे. मात्र सरकार कोसळून आपण सत्ताभ्रष्ट होऊ या भीतीपोटी सर्वजण गप्प राहून भ्रष्टाचारी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना पाठीशी घालत आहेत. ही गोष्ट गोव्याच्या हितासाठी अयोग्य व लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडालेल्या कामत सरकारने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी भाजप नेते, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी आज येथे बोलताना केली.
विदेशी चलन प्रकरणी कस्टमच्या जाळ्यात सापडलेल्या शिक्षणमंत्री मोन्सेरात यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने गोवाभर धरणे व निषेध कार्यक्रम आयोजीत केला आहे. त्या अंतर्गत तिसवाडी तालुका धरणे कार्यक्रमात खासदार नाईक बोलत होते. या प्रसंगी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, प्रदेश अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर, पणजी भाजप मंंडळ अध्यक्ष पुंडलीक राऊत देसाई, सांताक्रुझचे अनिल होबळे, प्रमोद कामत, हेमंत गोलतकर, शैलेश पै, सांतआंद्रेचे सुरेश बोरकर, सोमनाथ पाटील, कुंभारजुव्याचे प्रेमानंद सावंंत, सिद्धेेश नाईक तसेच ताळगाव पणजी मंडळाचे पदाधिकारी आणि पणजीच्या नगरसेविका वैदेही नाईक, दीक्षा माईणकर, शीतल नाईक, शुभदा धोंड, प्रतिमा होबळे, नगरसेवक शेखर डेगवेकर व शुभम चोडणकर आदी मान्यवर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
कॉंग्रेसाय स्वाहा म्हणण्याची वेळ
या प्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते श्री. पर्रीकर म्हणाले की, कामत सरकारच्या कारकिर्दीत घडलेली भ्रष्टाचारी प्रकरणे व त्यावर मुख्यमंत्री घालत असलेले पांघरूण पाहता लोकांनी या सरकारला स्वाह , कॉंग्रेसाय स्वाहा म्हणण्याची वेळ आली आहे. यावेळी श्री. पर्रीकर यांनी शिक्षणमंत्री व कॉंग्रेस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी यावेळी शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली.
या प्रसंगी प्रा. पार्सेकर, वैदेही नाईक, प्रा. पर्वतकर, अनिल होबळे, ज्योती मसूरकर, दीपक म्हापसेकर, मिनीन डिक्रुझ आदींची भाषणे झाली.

No comments: