प्रत्येक तालुक्यात निषेध धरणे व सही मोहीम
पणजी, दि.१० (प्रतिनिधी)
विदेशी चलन तस्करी प्रकरणी मुंबई कस्टम अधिकार्यांच्या कचाट्यात सापडलेल्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांची राज्य सरकार पाठराखण करीत असल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे उद्या ११ पासून निषेध धरणे व सह्यांची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
बाबूश मोन्सेरात यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी व एकूण आचरण पाहता त्यांना शिक्षणमंत्रीपदावर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार राहत नाही व त्यामुळे त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी प्रदेश भाजप तथा विधिमंडळ गटाने केली आहे. बाबूश यांच्याकडे नेमके किती प्रमाणात विदेशी चलन सापडले व त्यांचा हवाला प्रकरणांत सहभाग आहे काय, याची चौकशी ‘सीबीआय’मार्फत व्हावी, असे भाजपच्या गोवा प्रभारी तथा राष्ट्रीय अध्यक्ष आरती मेहरा यांनी म्हटले आहे.
राज्य मंत्रिमंडळातील काही नेते वारंवार विदेश दौरे का करतात व त्यांचे विदेशात नेमके कोणते धंदे सुरू आहेत याचीही माहिती जनतेसमोर यायला हवी, असा आग्रहही भाजपने धरला आहे. उद्या ११ रोजी पेडणे, मुरगाव, काणकोण, केपे तर १३ रोजी बार्देश, सत्तरी, डिचोली, तिसवाडी, फोंडा, सांगे व सासष्टी तालुक्यांत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निषेध धरणे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या दरम्यान, भाजप युवा मोर्चातर्फे सह्यांची मोहीमही राबवली जाणार आहे. या धरणे कार्यक्रमात भाजप नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे गुन्हेगारांना पाठीशी घालीत आहेत व अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्याला शिक्षणमंत्रीपदावर ठेवून ते राज्यातील भावी पिढीच्या भवितव्याशीच खेळत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
Monday, 11 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment