Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 15 April 2011

फातोर्डा भंगारअड्ड्यावर स्फोटात १ कामगार ठार

दोघे जखमी - टँकर कापताना घडलेली दुर्घटना
मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी)
चंद्रावाडो - आर्ले येथे भरवस्तीत असलेल्या एका भंगारअड्ड्यावर भंगारातील एक पेट्रोल टँकर कापताना त्याच्या एका कंपार्टमेंटचा भयावह स्फोट होऊन १ जण ठार झाला, तर तेथील दोघे कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला बांबोळीच्या ‘गोमेकॉ’ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भंगारअड्डा मालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा ठपका ठेवून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. त्यामुळे सार्‍या परिसरात घबराट माजली. लोक सैरावैरा पळत सुटले. सदर भंगारअड्डा अमन उल्ला याच्या मालकीचा आहे. तेथे भंगारासाठी आणलेल्या एक टँकरचे पत्रे गॅसकटरने कापून काढत असताना अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, तेथे काम करणारा गिलू पवार (३५, सांगली - महाराष्ट्र) नामक कामगार टँकरवरून सुमारे ५० मीटर दूर उडाला आणि जागीच ठार झाला. विमलेश (५०) व राकेश कुमार (२३) हे उत्तरप्रदेशातील दोघे कामगार गंभीर जखमी झाले. त्यात विमलेश जास्त होरपळल्याने त्याला बांबोळीच्या ‘गोमेकॉ’त उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राकेश कुमारवर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत.
हा भंगारअड्डा भरवस्तीत आहे. त्यामुळे स्फोटानंतर तेथे घबराट माजली. स्फोटानंतर ते तिघेही होरपळलेल्या व रक्तबंबाळ अवस्थेत तेथे पडले होते. मडगाव पोलिसांना व अग्निशामक दलाला याची माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना हॉस्पिसियोत दाखल केले व नंतर स्फोटाचा पंचनामा केला.
आमदार दामू नाईक, पालिका मुख्याधिकारी प्रसन्न आचार्य यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी या स्फोटाची पुढील चौकशी सुरू केली आहे.
भरवस्तीत असलेल्या भंगारअड्ड्यांत आता अशा प्रकारचे टँकर कापण्याची कामे चालतात. त्याकडे संबंधित अधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. त्यातूनच असे भयंकर अपघात घडतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आज टँकर कापताना जो स्फोट झाला त्या टँकरच्या तिन्ही कंपार्टमेंटना छिद्रे पाडून त्यातील वायूला वाट मोकळी करून देण्यात आली होती. तथापि, त्याचा चोरकप्पा तसाच राहून गेला व नेमका तोच स्फोटाचे कारण ठरला. सदर टँकर मळीची वाहतूक करण्यासाठी वापरला जात होता; पण परत गोव्याबाहेर जाताना दारू नेल्याच्या कारणावरून पकडला गेला होता व मोले नाक्यावर तसाच पडून राहिल्यावर त्याचा लिलाव पुकारला गेला. या भंगारवाल्याने तो घेतला व आणून तसाच वर्षभर राहिल्यावर तो कापण्याचे काम हाती घेतले असता सदर स्फोट झाला. त्यानंतर धातू कापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाला अशी अफवा सर्वत्र पसरली; पण नंतर तो स्फोट गॅसचा नव्हे तर टाकीचा असल्याचे दिसून आले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

मयेतील आठवणी
ताज्या करणारी घटना
केळबायवाडा - मये येथे ८ एप्रिल रोजी वेल्डिंग करताना अशाच प्रकारे एका जीपवरील केरोसीन टाकीचा स्फोट होऊन कुंदन मोहन मयेकर हा (वय ३२) वेल्डर ठार झाला होता. तसेच वाहनचालक दादासाहेब राणे जखमी झाला होता हे वाचकांना आठवत असेलच. फातोर्डा स्फोट दुर्घटनेमुळे मयेतील अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.

No comments: