Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 April, 2011

म्हापसा जिल्हा इस्पितळ ३१ मेपर्यंत सुरू करा

गोवा खंडपीठाचीा सरकारला शेवटची मुदत

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
म्हापसा जिल्हा इस्पितळ येत्या ३१ मे २०११ पर्यंत सुरू करण्यात यावे असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दिला. यापुढे सरकारला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून ही शेवटची मुदत असेल असेही मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व ए. धर्माधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
सदर इस्पितळाची काय स्थिती आहे याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने न्यायालयात सादर केला होता. तर आज सरकारतर्फे अर्ज करून इस्पितळ सुरू करण्यास आणखी मुदतवाढ द्यावी अशी लेखी विनंती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला केली होती. इस्पितळात ट्रामा, आयसीयू आणि पॅडिएट्रिक विभाग सुरू केला जाणार असल्याचे सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे हे इस्पितळ ‘पीपीपी’ तत्त्वावर चालवायला दिले जाणार आहे, मात्र अद्याप कोणताही कंपनी तयार झालेली नाही. त्यामुळे निविदेतील काही नियम शिथिल करून ४ जानेवारी २०११ रोजी नव्याने निविदा मागवण्यात आली असल्याचीही माहिती सरकारने न्यायालयाला दिली आहे. यासाठी सल्लागार म्हणून सरकारने ‘आयसीआर’ या कंपनीची नियुक्ती केली असल्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी न्यायालयाला सांगितले.

No comments: