पणजी, दि. १०
दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कला जोपासून लोकांना मूर्ती वेळेवर देण्याचे दिलेले आश्वासन जपणार्या काणकोण- सादोळशे येथील काणकोण तालुक्यातील पहिल्या महिला मूर्तिकार म्हणजे हिराबाई बाळ्ळे.
गोवा ही कलाकारांची खाण असल्याचे देशातील अनेक विद्वानांनी सांगितले आहे. तसेच प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात येणारा वक्ता किंवा प्रमुख पाहुणा गोवा ही कलाकारांची खाण आहे असे उच्चारल्याशिवाय राहत नाही. याचे कारणही तसेच आहे. गोव्याच्या कुठल्याही कानाकोपर्यात जर गेल्यास कलाकार सापडतातच. मग ते संगीत, नाटक, चित्रकारी, शिल्पकला, हस्तकला वा अन्य कुठल्याही कलेतील मातब्बर असो. यातील काही कलाकारांना जगप्रसिद्धी मिळाली तर काही जण पडद्याआडच राहिले. परंतु जे पडद्याआड राहिले त्या कलाकारांनी आपल्यातील कला ही आपली साधना मानून ती अखेरच्या श्वासापर्यंत जोपासलेली आहे. अशीच एक महिला म्हणजे काणकोण तालुक्यातील हिराबाई बाळ्ळे.
वयाच्या पंच्याहत्तरीपर्यंत त्यांनी गणपती, सरस्वती आणि इतर विविध प्रकारच्या चिकण मातीच्या मूर्ती करण्याचे काम करून आपल्यातील मूर्तिकार कलेची साधना केली आहे. माती कुटणे, मूर्ती करणे आणि त्या रंगवणे ही सर्व कामे त्या करत होत्या. अतिशय हळव्या मनाच्या आणि मितभाषी असलेल्या हिराबाई यांच्यातील कसलेला कलाकार आजही त्यांच्या डोळ्यातून अनुभवायला मिळतो. कालांतराने पती आणि वयात आलेल्या दोन मुलांचे आकस्मिक निधन झाले आणि काळाने त्यांचा आधारच त्यांच्यापासून हिरावून घेतला. जणू उतरत्या वयातही दिवसेंदिवस त्यांच्यातील कला फुलत असल्याचे काळालाही बघवले नसावे. हिराबाईंचे पती मूर्तिकार. गणेश चतुर्थीला काही दिवस असतानाच त्यांचे निधन झाले. अशावेळी हिराबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही न डगमगता मूर्तींचे उर्वरित काम पूर्ण करत लोकांना वेळेवर मूर्ती दिल्या. अशावेळी त्यांनी नमते घेतले नाही की समाजाच्या चौकटीत स्वतःला बंदिस्त करून आपल्या कलासाधनेत खंड पडू दिला नाही. मात्र यासाठी त्यांना समाजाचीही मदत झाली यात शंकाच नाही. पतीचे निधन झाल्यानंतरही कायमस्वरूपी असलेल्या ग्राहकांना त्यांनी मूर्ती तयार करून दिल्या. ग्राहक म्हणजे काही भरमसाठ पैसे मोजणारे नव्हेत तर ज्याला जसे वाट्टेल तसे पैसे देणारे. तरीही त्यांनी कला ही आपली साधना मानून त्यात खंड पडू द्यायचा नाही म्हणून काम केले. वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत त्यांनी मूर्ती करणे चालूच ठेवले.
उतरत्या वयात अवजड कामांसाठी मुलांची मदत मिळत असे. दोन मुलांच्या आधाराने कलेची जोपासना सुरूच ठेवली परंतु काळाने त्यांच्यावर दुसरा महाभयंकर घाव घातला आणि अवघ्या तेरा दिवसांच्या काळात दोन्ही मुलगे गेले. नंतर मात्र त्यांची अवस्था पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे झाली. ‘मन म्हणते घे गगन भरारी पण पंखच नसल्याने जोर नाही’ अशी. तरीही त्या तशा अवस्थेत एक दोन वर्षे धडपडत होत्या. परंतु आता त्यांचे वय ८० च्या घरात पोहोचल्याने अवजड काम नाही जमत, परंतु त्यांचे हात आणि मन मात्र अजूनही विविध मूर्त्यांना आकार देण्यास आणि त्यांच्यावर रंग चढवण्यास तळमळत आहेत.
त्यांच्या कलेच्या साधनेबद्दल त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, काळ झपाट्याने गेला. शरीर थकले तरी मनोबलावर सर्व काही तोलून धरले असते. परंतु काळाने माझ्या मनावर एवढे प्रहार केले की त्याच्यातून सावरणे आता जमत नाही. म्हणून काम बंद करावे लागले. विवाहाअगोदर मूर्ती करण्याची आवड होतीच. परंतु विवाहानंतर पतींच्या सहकार्याने मूर्ती करण्याचे शास्त्र शिकले. याचे कारण म्हणजे आमच्या घरात विविध मातीच्या मूर्ती करणे हाच मुख्य व्यवसाय होता. तो सुद्धा माझ्या विवाहापूर्वी योगायोगानेच सुरू झाला होता. त्याचा नंतर मलाच जास्त फायदा झाला. कारण माझीही बालपणापासूनच मूर्ती बनवणे हीच आवड होती. त्यामुळे मी या व्यवसायात चांगलीच रमू लागले. पण नंतर मात्र काळ करत असलेल्या आघातांनाच दोन हात करताना अधिक वेळ गेला आणि जे साधायचे होते ते अर्धवट राहिले. आजही खूप करावेसे वाटते पण नाही जमले.
त्यांच्या तोंडातून बाहेर पडणार्या शब्दांपेक्षा त्यांचे डोळेच खूप काही सांगून जात होते. अशा या कलेच्या महान साधकाला शतशः प्रणाम. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखकर जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Monday, 11 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment