खाजगी बसमालकांचे उपोषण सुरू
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)
गेले वर्षभर वारंवार विनवण्या करूनही सरकार मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ करत असल्याने खाजगी बसमालक संघटनेने आज दि. १२ पासून तीन दिवसांच्या उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. मलेरिया सर्वेक्षकांचे दि. ७ रोजी सुरू झालेले उपोषण अद्यापही सुरूच असल्याने आता राजधानीत यामुळे दुसर्या उपोषणास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांची सरकारने दखल न घेतल्यास दि. १५ पासून खाजगी बसमालकांचा बेमुदत संप सुरू होईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
खाजगी बसमालक संघटनेने आपल्या मागण्यांसंदर्भात सरकारला ५ रोजी निवेदन सादर केले होते. परंतु, सरकारने त्याची दखल न घेतल्याने या बसमालकांनी आजपासून तीन दिवसांच्या उपोषणास सुरुवात केली. दरम्यान, या उपोषणाचीही दखल न घेतल्यास दि. १५ पासून खाजगी बसमालक बेमुदत संप पुकारणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांना तिकीटदर सवलत, कदंबकडून छळणूक, संघटनेसाठी प्रत्येक बसस्थानकावर कार्यालय, बसेसवरील जाहिराती, अनुदान समितीवर संघटनेच्या अध्यक्षांची नेमणूक, वाहतूक धोरण, पणजी - मडगाव -आणि वास्को शहरांत बसेस नेण्यासाठी असलेले बंधन, संघटनेच्या एखाद्या सदस्याची रस्ता रहदारी प्राधिकरणावर नेमणूक, तिकीट मशीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत आदी संदर्भातील खाजगी बसमालक संघटनेच्या एकूण १५ मागण्या आहेत. परंतु, सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. वारंवार आश्वासने देऊन बसमालकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे हा आंदोलनाचा मार्ग पत्करण्यावाचून पर्याय उरला नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आज सुमारे पन्नास बसमालक उपोषणात सहभागी झाले होते. सरचिटणीस ताम्हणकर हे संघटनेच्या मागण्यांसाठी स्वतंत्र उपोषण करत आहेत तर इतर बसमालक साखळी उपोषणाला बसले आहेत.
Wednesday, 13 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment