Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 12 April, 2011

शिरगाववासीयांचे आता बाबा रामदेवांना साकडे!

अण्णा हजारे यांनाही आमंत्रित करणार
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)
श्री देवी लईराईचे आदिस्थान असलेल्या शिरगाव गावचे रक्षण करण्यासाठी आता थेट भारत स्वाभिमानचे अध्वर्यू बाबा रामदेव यांनाच साकडे घालण्याचा निर्णय शिरगाव बचाव समितीने घेतला आहे. राळेगणसिद्धी गावात शेतीची क्रांती घडवून आणलेले व सध्या देशात भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त करून दिलेले अण्णा हजारे यांनाही शिरगावला भेट देण्याचे आमंत्रण दिले जाईल, अशी माहिती समितीने दिली आहे.
कोमुनिदाद तथा सामूहिक जमिनीच्या संरक्षणार्थ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निवाड्यामुळे शिरगावातील लोकांत चैतन्य पसरले आहे. खाण उद्योगामुळे अखेरची घटका मोजणारा हा गाव वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्याची तयारी समितीने चालवली आहे. अलीकडेच भारत स्वाभिमानतर्फे गोव्यात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बाबा रामदेव यांनी गोव्यातील खाण उद्योगाच्या गंभीर परिणामांची दखल घेतली होती. गोवा तसेच इतर राज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरगावची याच खाण उद्योगामुळे झालेली दैना सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यासाठी बाबा रामदेव यांची मदत घेण्याचा विचार समितीने चालवला असून त्याबाबत बाबा रामदेव यांना अवगत करून शिरगाववासीयांना मदतीचा हात देण्याचे आवाहन त्यांना केले जाईल, अशी माहितीही समितीने दिली आहे.
शिरगावात लाखो चौरस मीटर कोमुनिदाद जमिनीवर खाण उद्योजकांनी अतिक्रमण केले आहे. राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने तसेच गावातील काही लोकांना पैशांचे आमिष दाखवून खाण उद्योजक गेली साठ वर्षे शिरगावचे शोषण करीत आहेत. या खाण उद्योगाविरोधात लढा देण्यासाठी उभे राहिलेल्या शिरगाववासीयांची हेळसांड सुरू असून त्यांना लक्ष्य बनवण्याचेही प्रकार सुरू आहेत. शिरगावातील खाण उद्योग हा देखील सरकारी भ्रष्टाचाराचाच परिपाक आहे. कधीकाळी शेतीप्रधान व नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या या गावच्या दुरवस्थेचे दर्शन अण्णा हजारे यांना घडवून आणण्याचेही प्रयत्न सुरू असून ते विविध राज्यांचा जेव्हा दौरा करतील तेव्हा त्यांना या गावाला भेट देण्याचे आमंत्रण समिती देणार आहे. गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी मंडळाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. माधव गाडगीळ तसेच केंद्र सरकारने बेकायदा खाणींबाबत चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगासमोरही शिरगावातील बेसुमार खाणींचे प्रकरण सादर केले जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

No comments: