Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 12 April, 2011

तो मृतदेह जनार्दनचाच!

मोले खूनप्रकरणी राजू कोकरे यांचा दावा

फोंडा व डिचोली, दि. ११ (प्रतिनिधी)
बरकटे - मोले येथे रविवार १० एप्रिल २०११ रोजी खून करून सुमो जीपमध्ये जाळण्यात आलेल्या अज्ञाताच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र सदर गाडीत आढळून आलेला मृतदेह आपल्या भावाचाच असल्याचा दावा जनार्दन कोकरे याचा भाऊ राजू कोकरे यांनी केला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचा संशय व्यक्त करून राजू कोकरे यांनी त्या बाबतीत अनेक संदर्भही पत्रकारांशी बोलताना उघड केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
जीपमध्ये पूर्णपणे जळलेल्या स्थितीत असलेला मृतदेह हा गेल्या शनिवारपासून बेपत्ता असलेल्या जनार्दन कोकरे याचाच असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांकडून केला जात असला तरी त्यावर पोलिसांनी अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे ह्या जाळण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कुळे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी दिली आहे.
मृतदेह जाळण्यात आलेली टाटा सुमो जीप गाडी (जीए ०४ सी ०१८३) ही पैरा - मये येथील जनार्दन विठू कोकरे याच्या मालकीची आहे. या जीपगाडीत मागील सीटवर जळलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. ह्या मृतदेहाचे मुंडके आगीत जळल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. मृतदेह जळलेल्या स्थितीत असल्याने शवविच्छेदन अहवाल पोलिसांना उशिरापर्यंत प्राप्त झालेला नव्हता.
जनार्दन कोकरे हा गेल्या शनिवार ९ रोजी वास्को येथून भाडे घेऊन बेळगावला जाणार होता, अशी माहिती जनार्दन कोकरे याच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे जनार्दन कोकरे याच्या भावाला घटनास्थळी नेऊन मृतदेहाची ओळख पटविण्याची विनंती पोलिसांनी केली. मृतदेह पूर्णपणे जळलेल्या स्थितीत असल्याने ओळख पटविणे कठीण बनले आहे.
‘खून पूर्ववैमनस्यातूनच’
दरम्यान, जनार्दन याचा भाऊ राजू कोकरे यांनी पत्रकारांसमोर केलेल्या दाव्याप्रमाणे पूर्ववैमनस्यातूनच हा खून घडला आहे. जनार्दनला काही महिन्यांपासून परदेशातून धमकीवजा फोन येत होते. हल्लीच त्याचे एका शेजार्‍याशी जमिनीच्या वादातून भांडणही झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराच्या मागील बाजूस कुणी अज्ञाताने आगही लावली होती. आपल्याला येणार्‍या धमकीच्या फोनविषयी जनार्दन याने आपल्या एका मित्राला कळवले होते व या संदर्भात लेखी तक्रारही त्याने तयार करून ठेवली होती, असे राजू कोकरे यांनी सांगितले. त्यामुळे या धमकीच्या फोनची, मागीलदारी लावलेल्या आगीची व अन्य संबंधित प्रकरणांची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मनोज म्हार्दोळकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

No comments: