भाजपतर्फे विविध तालुक्यांत धरणे
वास्को, दि. ११ (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना विदेशी चलन तस्करी प्रकरणी मुंबई कस्टम्स अधिकार्यांनी रंगेहाथ पकडूनही कामत सरकार त्यांची पाठराखण करत असल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी भाजपतर्फे राज्यातील विविध तालुक्यांत धरणे धरण्यात आले. गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या बाबूश यांना मंत्रिमंडळातून तात्काळ डच्चू दिला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज पेडणे, केपे, मुरगाव व काणकोण या तालुक्यांत हे आंदोलन छेडले गेले.
सध्या विदेशी चलन तस्करी प्रकरणात अडकलेले बाबूश मोन्सेरात यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी व एकूण विवादास्पद आचरण पाहता त्यांना शिक्षणमंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांना या पदावरून त्वरित बडतर्फ करावे, म्हणून विरोधी भाजप आमदारांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात अभूतपूर्व गदारोळ माजवला होता. प्रदेश भाजपनेही विविध प्रसंगी बाबूश यांच्या बडतर्फीची मागणी केली होती. दरम्यान, आजपासून भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकरणी आपली मोहीम अधिकच तीव्र केली असून विविध तालुक्यांत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मुरगावात तीव्र निषेध
बाबूशप्रकरणी मुरगावातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आज धरणे धरून कामत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. वास्को, मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळी अशा चारही मतदारसंघांतील भाजप कार्यकर्त्यांनी मुरगाव नगरपालिकेच्या इमारतीबाहेर धरणे धरले. यावेळी उपस्थित भाजपचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर, जयंत जाधव, नगरसेवक कृष्णा (दाजी) साळकर, नगरसेविका सारिका पालकर, नगरसेवक राजेश रेडकर तसेच इतर भाजप नेत्यांनी कामत सरकारातील शिक्षणमंत्र्यांसोबतच अन्य भ्रष्टाचारी मंत्र्यांवर सडकून टीका केली. बाबूशकडे यांच्याकडे नेमके किती प्रमाणात विदेशी चलन सापडले व त्यांचा हवाला प्रकरणात सहभाग आहे काय, याची चौकशी ‘सीबीआय’ मार्फतच व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाबूश यांची पाठराखण करून मुख्यमंत्री गोव्यातील जनतेला चुकीचा संदेश देत आहेत, असाही आरोप यावेळी करण्यात आला.
सकाळी दहा वाजता सदर धरणे आंदोलन सुरू झाले. यावेळी बाबूश व कामत सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात प्रशांत नार्वेकर, दिगंबर आमोणकर, किरण नाईक, समीर वाळके, सचिन चौगुले, उल्का गावस, ऍड विद्या शेट, नगरसेविका सुमिता उजगावकर, चंद्रकांत गावस यांचा सहभाग होता. मुरगाव नगराध्यक्षा सौ. सुचिता शिरोडकर यांनीही येथे उपस्थिती लावली. संध्याकाळी साडे पाच वाजता धरण्याची सांगता करण्यात आली.
Tuesday, 12 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment