Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 16 April 2011

नार्वेकर जन्मतारीख फेरफारीची तक्रार सीबीआयकडे द्या

• शेखर साळकर यांची मागणी

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
माजी मंत्री तथा आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आपल्या मुलाच्या जन्मतारखेत फेरफार करून फसवणूक केल्याच्या तक्रारीवर तपास करण्यास म्हापसा पोलिसांना अपयश आल्याने सदर तक्रार येत्या ४८ तासात गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवावी, अशी मागणी आज (दि.१५) तक्रारदार डॉ. शेखर साळकर यांनी केली. या मुदतीत मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि गृहमंत्री रवी नाईक यांनी हे प्रकरण ‘सीआयडी’कडे न सोपवल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही डॉ. साळकर यांनी आज दिला. ते पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ऍड. नार्वेकर यांच्यावर त्यांनी आरोपांच्या जोरदार फैरी झाडल्या.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. ऍड. नार्वेकर यांचा मुलगा गणेशराज याची जन्म तारीख २८ फेब्रुवारी १९९२ अशी आहे. के. जीमध्येही त्याच्या दाखल्यावर ही जन्मतारीख आहे, असा दावा यावेळी डॉ. साळकर यांनी केला. परंतु, या प्रकरणाची चौकशी करणारे म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेशकुमार हे ‘तो दाखला ऍड. नार्वेकर यांच्या पत्नीनेच शाळेत दिल्याचा काय पुरावा आहे’ असा प्रश्‍न केल्याची माहिती डॉ. साळकर यांनी दिली. हा दाखला त्यांच्या पत्नीने शाळेत दिला नसल्यास त्या तारखेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी बदल केला आहे का, असा सवाल करत तसे असल्यास पोलिसांनी त्या मुख्याध्यापकाची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. साळकर यांनी केली.
आपण ऍड. नार्वेकर यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्याने आपल्याला तसेच डिचोली क्रिकेट क्लबला लक्ष केले जात असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. त्यामुळे आपण गेल्या २८ ऑक्टोबर रोजी या क्लबच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, येत्या सोमवारी ऍड. नार्वेकर यांनी विशेष कार्यकारिणी बैठक बोलावली आहे. त्यात त्यांनी आपल्यावर कारवाई करूनच दाखवावी, असे जाहीर आवाहन डॉ. साळकर यांनी दिले आहे. आपण आजीवन गोवा क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असून त्यावरून आपल्याला कोणीच हटवू शकत नाही. गेल्या दहा वर्षात ‘बीसीसीआय’कडून गोवा क्रिकेट असोसिएशनला सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी आला आहे. ते शंभर कोटी रुपये ऍड. नार्वेकर यांनी कुठे खर्च केले, याची माहिती त्यांनी उघड करावी. ‘जीसीए’ची वाहने ते आपल्या कुटुंबीयांसाठी वापरत आहेत. प्रत्येक क्लबला लागणारी बॅट आणि बॉल हे त्यांच्या पत्नीकडूनच घ्यावे लागतात. तसेच, नार्वेकर यांचा पर्वरी येथे एक फ्लॅट असून त्याचा ‘जीसीए’साठी गेस्ट हाउस म्हणून वापर करून त्याचेही पैसे कमावले जात असल्याचा आरोप यावेळी डॉ. साळकर यांनी केला. त्याचप्रमाणे एक बस असून ती निवडणुकीच्या काळात शिर्डीला जाण्यासाठी वापरली जाते, असेही ते शेवटी म्हणाले.

No comments: