पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा आणि त्यांच्या बंधूंनी भ्रष्टाचार करून सरकारी जमीन बळकावल्याने त्यांच्याविरुद्ध दक्षता विभागात तक्रार करण्यात आली आहे. सुमारे १०२ चौरस मीटर जागा बेकायदा बळकावली असल्याचा दावा करून प्रदीप काकोडकर, डॉ. केतन गोवेकर व ऍड. अतिश मांद्रेकर यांनी ही तक्रार केली आहे. तसेच, या तक्रारीची नोंद न केल्यास न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे मंत्री जुझे डिसोझा आणि त्यांच्या बंधूवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १३(१)सी आणि १३(१)डी, तसेच २१८, ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ व १२०(ब) कलमानुसार गुन्हा नोंद करण्याची विनंती करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटल्यानुसार महसूल मंत्री जुझे फिलिप, क्लिमेंटी डिसोझा, जुझे निक्लांव डिसोझा यांनी मामलेदार, किनारी नियमन प्राधिकरण, मुरगाव पालिका आणि अन्य सरकारी अधिकार्यांच्या मदतीने १०२ चौरस मीटरची मोक्याची जागा बळकावली आहे. सदर जागा ‘सीआरझेड’ भागात येत असतानाही बनावट दाखले करून ती ‘सीआरझेड’मध्ये येत नसल्याचे दाखवण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
त्यामुळे या तक्रारीवर दक्षता विभागाने या प्रकारची चौकशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या भ्रष्टाचारामुळे सरकारी तिजोरीला फटका बसला आहे. कलम १५४(१)नुसार माहिती मिळताच त्या तक्रारीची नोंद घेऊन चौकशी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे तक्रारीची दखल घेऊन चौकशी न केल्यास न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रारीची एकप्रत भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या पोलिस अधीक्षकांनाही पाठवण्यात आली आहे.
Thursday, 14 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment