Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 11 April 2011

शिक्षणपद्धती हेच सर्व समस्यांचे मूळ - कांबळे

गोमंत विद्यानिकेतनचा वर्धापनदिन
मडगाव, दि. १०(प्रतिनिधी)
देश स्वतंत्र होऊन पन्नास वर्षे उलटूनही ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धती देशात चालू आहे व आजच्या सर्व समस्यांचे तेच कारण आहे. ब्रिटिशांनी येथून जाते वेळी भारताविषयी काही भाकिते लिहून ठेवली होती व त्यात शिक्षणविषयक भाकितात स्वतंत्र भारतातील स्वतंत्र नागरिकांनी आपणासाठी कोणती शिक्षणपद्धती हवी ती निश्‍चित करावी असे नमूद केले होते. पण अजूनही ती पद्धती आलेली नाही व स्वतंत्र भारतात आपण गुलामगिरीचेच जिणे जगत आहोत असे परखड विचार सकाळ वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक उत्तमराव कांबळे यांनी आज (दि.१०) येथे व्यक्त केले.
येथील गोमंत विद्या निकेतनच्या ९९ व्या वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यानिकेतनचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यात कविश्रेष्ठ दा. अ. कारे स्मृती गोमंतदेवी पुरस्कार कविश्रेष्ठ ग्रेस यांना, केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार डॉ. आशा सावर्डेकर यांना तर सावित्रीबाई दलाल स्मृती स्वयंसिद्धा पुरस्कार वंदना बोरकर व काशिनाथ दामोदर नायक स्मृती पुरस्कार माशे काणकोण येथील निराकार शिक्षणसंस्थेला प्रदान करण्यात आला.
डॉ. अशोक मणगुतकर व श्रीमती सुनंदा नाईक यांना विद्या निकेतनचे साहित्य पुरस्कार कवी ग्रेस यांच्या हस्ते प्रदान केले गेले. शाल व श्रीफळ, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व मानपत्र अशा स्वरूपातील ते पुरस्कार होते. मानपत्रांचे वाचन विनय कामत, मयुरा नायक, लक्ष्मण परब व सीताराम टेंगसे यांनी केले.
पुढे बोलताना श्री. कांबळे यांनी आजची स्पर्धा ही जीवघेणी असली तरी ती विषम लोकांची असल्याचे प्रतिपादिले. त्यात जिंकणार्‍यांनी कायम जिंकायचे व हरणार्‍याने सतत हरायचे अशी व्यवस्था आहे. पण त्यात आपले शिक्षण, आपले शिक्षक यांना कुठेच स्थान नाही. ब्रिटिशांनी भारताला जरी स्वातंत्र्य दिले तरी गुलामगिरीची मनोवृत्ती कायम राहील अशीच व्यवस्था केल्याचे श्री. कांबळे यांनी उदाहरणासह सांगितले. त्यांनी आज गुणवत्तेला नव्हे तर एसएमएसवर सारी स्पर्धा कशी चालते ते सांगताना समाजाच्या गतीने पुस्तके व शाळा तसेच शिक्षकांनी आपली कार्यपद्धती बदलण्याची व ती बदलताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास होण्याची गरज प्रतिपादन केली. त्यांनी जागतिकीकरण वस्तूंचे नव्हे तर माणसांचे होऊ लागले आहे असे सांगून बदलत्या समाजव्यवस्थेत वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आज आपल्या हातून झालेल्या थोर व्यक्तींच्या सत्कारामुळे आपण धन्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
कविवर्य ग्रेस यांनी आत्माहुंकाराचा शोध प्रत्येकाने घ्यावा. तो घेतला तर आत्मज्ञान प्राप्त होईल. आज तो कुठेच जाणवत नाही. आपण तो का गमावला याचा विचार प्रत्येकाने केला तर त्यातच त्याचे उत्तर सापडेल, अक्षरे पुसण्याने नव्हे, असे सांगितले.
डॉ. आशा सावर्डेकर यांनी सत्काराला उत्तर देताना हा केवळ आपला एकटीचा नव्हे तर सर्व सहकार्‍यांचा सत्कार असल्याचे सांगितले. तर वंदना बोरकर यांनी हा पुरस्कार उत्साह दुणावणारा व पाठीवर समाधानाची थाप देणारा असल्याचे सांगितले. प्रशांत नाईक यांनी निराकार संस्थेचा पुरस्कार स्वीकारताना त्याचे सारे श्रेय सहकार्‍यांना दिले. त्यांनी गोव्यात सध्या चालू असलेल्या स्थानिक भाषा रक्षण आंदोलनात गोमंत विद्यानिकेतनने दक्षिण गोव्याचे नेतृत्व करावे अशी विनंती केली.
प्रथम संस्थेचे अध्यक्ष अशोक कारे यांनी स्वागत केले व विद्यानिकेतनच्या, सभागृहाचे नूतनीकरण येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात ‘स्मरुनी गोमंतदेवी’ प्रार्थनेने झाली. सूत्रसंचालन देवकी नायक यांनी केले. यावेळी श्री कांबळे यांना स्मृतिभेट देण्यात आली तर उद्योगपती सुरेश कारे यांना दत्ता नायक यांनी पुष्पगुच्छ प्रदान केला.
उपस्थितांत माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेेकर यांचा समावेश होता.

No comments: