म्हापसा व पणजीत महिलांना लुबाडले
म्हापसा व पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)
‘राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला असून अंगावर मौल्यवान दागिने घालून फिरणे धोक्याचे आहे. आम्ही पोलिस असून तुमचे दागिने व्यवस्थित बांधून देतो’, अशी बतावणी करत महिलांना अंगावरील दागिने उतरवण्यास भाग पाडून ते हातोहात लंपास करणार्या तोतया पोलिसांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे. आज दि. ११ रोजी या बतावणीच्या आधारे म्हापशात दोन ठिकाणी तर पणजीत एके ठिकाणी त्यांनी तिघा महिलांना लाखो रुपयांना गंडा घातला.
पणजीत महिलेला लुटले
सान्तिनेज - पणजी येथे आज सकाळी ४५ वर्षीय शकुंतला नाईक या महिलेला दोघा तोतया पोलिसांनी ५५ हजार रुपयांना लुटले. पणजीत चोरांचा वावर वाढलेला असल्याचे सांगत त्यांनी तिच्या अंगावरील २ पाटल्या व एक अंगठी काढून घेतली. तसेच, ते दागिने बांधून देत असल्याचे भासवून त्या दोघांनी येथून पलायन केले. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यावर सदर महिलेने पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली.
सकाळी ९च्या दरम्यान शकुंतला नाईक रस्त्याने जात असता एक तरुण त्यांच्याकडे आला आणि त्यांना साहेब बोलावत असल्याचे सांगून दुसर्या तरुणाकडे घेऊन गेला. त्याने तिला अंगावरील दागिने काढण्यास सांगितले व ते एका कागदात बांधून तिच्याकडे असलेल्या पिशवीत ठेवले. पुढे जाऊन तिने पिशवीत पाहिले असता त्यात दागिने नसल्याचे तिच्या लक्षात आले. सदर तोतया पोलिस कोकणी व हिंदी भाषेतून बोलत होते, अशी माहिती मिळाली आहे. या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रदीप वेळीप करीत आहेत.
म्हापशात दोघांना गंडवले
दरम्यान, पणजीत घडलेल्या प्रकाराचीच हुबेहूब पुनरावृत्ती आज म्हापशात दोन ठिकाणी घडली. येथील कवळेकर टॉवरकडून चालत येणार्या ऊर्मीला विजय नाईक यांना वाटेत अडवून दोघा युवकांनी तिच्याकडील सुमारे ५५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. सकाळी ११.१५ वाजता हा प्रकार घडला. आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांनी सौ. नाईक यांना अंगावरील ३० हजारांचे मंगळसूत्र, १० हजारांची सोनसाखळी, १५ हजारांची सोन्याची बांगडी काढण्यास सांगितले. हे नग कागदात बांधून देण्याचा बहाणा करत त्यांनी दुसरेच पुडके त्यांच्या बॅगेत टाकले. पुढे पोलिस स्टेशनजवळ जाऊन सौ. नाईक यांनी दागिने पाहिले असता आत एक लोखंडी चकती व एक दगड सापडला. त्यानंतर त्यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार नोंदवली.
असाच प्रकार सकाळी १०.३० वाजता डांगी कॉलनीतील शांताबाई च्यारी (४५) यांच्या बाबतीत घडला. सदर महिलेला २० ते २५ वयोगटातील दोघा युवकांनी वाटेत रोखले व शहरात भुरटे चोर फिरत असल्याचे सांगून त्यांच्याकडील २० हजारांचे मंगळसूत्र, १० हजारांची सोनसाखळी व १५ हजारांची बांगडी मिळून ४५ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. हे दागिने कागदात गुंडाळत असल्याचे भासवत त्यांनी शिताफीने दगड असलेले पुडके त्यांच्या हवाली केला. पुढे जाऊन शांताबाई यांनी हे पुडके उघडून बघितले असता आपण लुबाडले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची तक्रार पोलिस स्थानकात नोंद केली आहे. या प्रकरणांचा तपास म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक संदीप केसरकर करीत आहेत.
Tuesday, 12 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment