Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 12 April, 2011

खोतोडे - गवाणेतील संतप्त नागरिकांनी खनिजवाहू ट्रक रोखले

वाळपई, दि. ११ (प्रतिनिधी)
गवाणे - सत्तरीतील टीसी क्र. ३१/५५ या बेकायदा खाणीच्या विरोधात सरकारला वारंवार निवेदने सादर करूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट सदर ठिकाणी खनिज उत्खनन होतच असून त्याची वाहतूकही सुरू असल्याने येथील जवळजवळ दीडशे संतप्त नागरिकांनी सोमवारी खनिज वाहतूक करणारे सुमारे ७० ट्रक खोतोडे पंचायतीजवळ रोखून धरले.
दरम्यान, या बेकायदा खनिज वाहतुकीसंदर्भात वाळपई पोलिसांत सकाळीच तक्रार नोंदवल्यानंतर तिथे पोलिस फौजफाट्यासह पोहोचलेल्या निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी घटनेचा कोणताही पंचनामा न करता व खनिजाची तपासणी न करता अडवलेले ट्रक मुक्त केल्याने येथील नागरिकांनी त्यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. सदर प्रकार हा खनिज चोरीचाच प्रकार असल्याने तो खाण खात्याच्या अखत्यारीत येतो. त्या विषयी खाण खात्याला आधीच अवगत करण्यात आले होते. मात्र, याची कोणतीही दखल न घेता निरीक्षक वायंगणकर सदर ट्रक कसे मुक्त करू शकतात, असा सवाल राजेश गावकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी ट्रक सोडल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खाण खात्याचे दीपक मयेकर, श्री. कामत व अन्य सर्वेक्षक घटनास्थळी पोहोचले. जमलेल्या लोकांनी विलंबाचे कारण विचारता, आपल्या गाडीला येताना अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. हा सर्व बनाव असून हे खाण खात्याचे व पोलिसांचे ‘सेटिंग’ आहे, अशी प्रतिक्रिया विश्‍वेश परोब यांनी व्यक्त केली. दरम्यान, या खाणीला वनखात्याचा परवाना नाही व जवळपास ५३,१५० चौरस मीटर जागेत हे बेकायदा उत्खनन केल्याचा अहवाल तलाठ्यांनी मामलेदारांना गेल्या वर्षीच दिला आहे. मात्र तरीही ही खाण सुरू असल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष धुमसत असून नागरिकांनी आजच्या बेजबाबदार कारवाईबद्दल निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या विरोधात डिचोली उपजिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार नोंदवली आहे. या संदर्भात नागरिकांनी जनहित याचिकाही दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आज नागरिकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात सखाराम गावकर, विश्‍वेश परोब, रणजीत राणे, गॅब्रिएल डिकॉस्टा, राजेश गावकर, सगुण गावकर, विश्‍वनाथ घोलेकर, गजानन घोलेकर तसेच असंख्य खाण विरोधकांचा समावेश होता.

No comments: