हवाला प्रकरणी बाबूशची सीबीआय चौकशी करा : मेहरा
भाजपचे अकराही तालुक्यांत उद्यापासून निषेध धरणे
पणजी,द. ९ (प्रतिनिधी): विमानातून प्रवास करताना किती प्रमाणात चलन न्यायचे याबाबत आपण अनभिज्ञ होतो व यापूर्वी आपण अशाच पद्धतीने पैसा नेल्याचे स्वतःच जाहीर केलेल्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांची हवाला प्रकरणी ‘सीबीआय’ चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी आरती मेहरा यांनी केली. आधीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व बेहिशेबी विदेशी चलन तस्करी प्रकरणी कस्टम्सच्या ताब्यात अडकलेल्या बाबूश यांना शिक्षणमंत्रिपदावर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही व त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी व्हावी यासाठी भाजप अकराही तालुक्यात निषेध धरणे आयोजित करणार असल्याचेही त्यांनी घोषित केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की भाजपतर्फे ११ व १३ रोजी सर्व अकराही तालुक्यांत निषेध धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात ११ रोजी पेडणे, मुरगाव, काणकोण व केपे तालुक्यांचा समावेश आहे. १३ रोजी बार्देश, सत्तरी, डिचोली, तिसवाडी, फोंडा, सांगे व सासष्टी या तालुक्यांत हे आंदोलन केले जाईल. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही धरणे धरण्यात येतील.
इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केलेल्या या नेत्याकडे शिक्षण मंत्रिपद बहाल करून सरकारने भावी पिढीसमोर कोणता आदर्श ठेवला आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. मुंबई विमानतळावर त्यांच्याकडे सापडलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्याकडून ‘फेमा’ व कस्टम्स कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ६० लाख रुपये घेऊन जाताना विमानतळावर अटक करण्यात आली होती. यावेळी कस्टम्स अधिकार्यांनी तात्काळ त्यांच्याकडे सापडलेल्या चलनाची विस्तृत माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघड केली होती. आता बाबूश यांच्याबाबत कस्टम्स अधिकारी नेमकी माहिती का लपवतात, असा सवाल करून केंद्रीय वित्त मंत्रालयाने या प्रकरणी अधिकृत वक्तव्य करण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. आपण या प्रकरणी केंद्रीय गृह तथा वित्तमंत्र्यांना पत्र पाठवले आहे व त्यांना बाबूश यांच्याकडे नेमकी किती चलन सापडले याची माहिती जनतेसमोर ठेवण्याची विनंती केल्याचेही त्या म्हणाल्या. भाजप या विषयी राष्ट्रीय पातळीवरही आवाज उठवेल, असे स्पष्ट संकेतही त्यांनी यावेळी दिले.
बाबूश यांना कस्टम्स कायदा १९६२ अंतर्गत कलम ११३ नुसार तात्काळ अटक होणे गरजेचे होते. पण केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई टाळली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याचे शिक्षणमंत्रीच अशा बेशरम कृतीत सापडल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणेच उचित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अण्णांच्या आंदोलनाला भाजपचा पूर्ण पाठिंबा
संसदेत विरोधी भाजपने सरकारच्या अनेक भ्रष्ट कारभारांचा भांडाफोड केला आहे. हा लढा चालूच राहणार आहे. अण्णा हजारे यांनी जन लोकपाल विधेयकासाठी चालवलेले आंदोलन पूर्णपणे समर्थनीय आहे व भाजपने सुरुवातीपासूनच त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे, असेही त्या म्हणाल्या.
१९ व २० रोजी गाभा समितीची बैठक
गोव्यातील पुढील विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी १९ व २० रोजी पक्षाच्या गाभा समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी व लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे हजर राहणार आहेत. भाजपने पुढील निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे युती करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी याबाबतचा अंतिम निर्णय या बैठकीत होईल. पुढील विधानसभा निवडणुकीत कुणाशी युती करावी अथवा कोणती रणनीती आखावी हे ठरवण्यात येईल, असेही श्रीमती मेहरा यांनी स्पष्ट केले.
Sunday, 10 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment