अपघात थोडक्यात टळला - आज उपजिल्हाधिकार्यांसोबत बैठक
डिचोली, दि. १४ (प्रतिनिधी)
डिचोली हमरस्त्यावरून भरवेगाने खनिज मालाची वाहतूक करणार्या एका ट्रकाखाली सापडता सापडता तिथे उभा असलेला पादचारी थोडक्यात वाचला. मात्र या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येथील खनिजवाहू ट्रकच रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला. सातत्याने होणार्या या खनिज वाहतुकीमुळे येथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे जमलेल्या नागरिकांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी भरधाव वेगाने येणार्या खनिजवाहू ट्रकाखाली एक इसम येणार होता, अशी माहिती समीर वायंगणकर यांनी दिली. त्यामुळेच संतापलेले लोक एकत्र आले व त्यांनी सर्व ट्रकच रोखून धरले. दरम्यान, तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी यात हस्तक्षेप करत ट्रकचालकांचीच बाजू घेतल्याचे व जमलेल्या लोकांना पांगवल्याचे ऍड. अजितसिंह राणे यांनी सांगितले. डिचोलीतून खनिज वाहतुकीचा विषय सध्या न्यायालयप्रविष्ट असतानाही ही वाहतूक सरकारच्या व पोलिसांच्या पाठबळावर निर्धोकपणे सुरू असल्याचेही ते म्हणाले.
यापूर्वी, आम्ही चार वेळा ही धोकादायक वाहतूक रोखली. आमच्यावर न्यायालयात खटलेही सुरू आहेत. मात्र, जनतेच्या जिवाशीच खेळ चालला असल्याने आता गप्प राहणे शक्यच नाही, अशी प्रतिक्रिया गोकुळदास हरवळकर यांनी व्यक्त केली.
तर पुन्हा आंदोलन ः पाटणेकर
दरम्यान, यावेळी घटनास्थळी दाखल झालेले आमदार राजेश पाटणेकर यांनी सदर वाहतुकीवर नियंत्रण आणले गेले नाही तर पुन्हा जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी उपजिल्हाधिकार्यांशी फोनवरून संपर्क साधला असता, सदर वाहतूक पूर्णपणे बेकायदा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागावा म्हणून उद्या दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला आमदार राजेश पाटणेकर, ऍड. राणे व अन्य नागरिक उपस्थित राहणार आहेत.
Friday, 15 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment