Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 16 April 2011

खारीवाड्यात मासेमारी ठप्प

• जलवाहतूक रोखली
• आज वास्को बंदचे आवाहन

वास्को, दि. १५ (प्रतिनिधी)
पंधरा दिवसांपूर्वी खारीवाडा येथील ६६ घरे बुलडोझरच्या साहाय्याने पाडल्यानंतर उर्वरित घरे वाचवण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्याला सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’ समितीने काल (दि.१४) मध्यरात्री सुरू केलेल्या बेमुदत आंदोलनाला मच्छीमारांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर येथील सुमारे ३०० मासेमारी ट्रॉलर्स व २५० मासेमारी नौका येथील समुद्रात नांगरून मुरगाव बंदराचा (एम.पी.टी) पाण्यातील पूर्ण व्यवसाय पूर्ण ठप्प केला. जोपर्यंत सरकार आमच्या पाच मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून उद्या (दि.१६) वास्को बंदचे आवाहन खारीवाडावासीयांनी केले आहे.
‘एम.पी.टी’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर बंदराच्या विस्तारीकरणासाठी व अन्य कारणांसाठी खारीवाडा येथील जागा रिकामी करून देण्याबाबत याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने पालिकेला याबाबत आदेश जारी केले होते. यानंतरच्या सुनावणीत ज्या घरांनी स्थगिती मिळवलेली नाही त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई का केली नाही असा सवाल करत पालिकेला येथील ६६ घरे पाडण्याचे आदेश दिले होते. सदर ६६ घरे पाडल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला. यातूनच ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’ समितीने गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सदर मुद्यावर तोडगा काढण्याची विनंती काही दिवसांपूर्वी केली असता त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली, मात्र दहा दिवसांहून अधिक वेळ उलटूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे समितीने आजपासून हे आंदोलन छेडले आहे.
या बंदमुळे आज ‘एम.पी.टी’चा पाण्यातील सर्व व्यवसाय ठप्प झाला असून त्यामुळे सुमारे तीन ते चार कोटींपेक्षा जास्त रुपयांची हानी झाल्याचाअंदाज आहे. तसेच ‘एम.पी.टी’ ची पाण्यातील वाट बंद केल्याने गोव्यातील बार्ज मालकांना सुमारे चार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी दिली. खारीवाडा प्रश्‍नांवर आम्ही सरकारशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान सदर आंदोलनामुळे वास्कोतील मासळी मार्केट तसेच फळबाजारही आज बंद ठेवण्यात आला. खारीवाडा येथील शेकडो महिलांनी पालिकेच्या बाहेर धरणे धरले होते. आज सकाळी ६ वा. आंदोलन करणार्‍यांनी ‘एम.पी.टी’ च्या गेट क्रमांक ९ बाहेर आपले टेंपो तसेच इतर वाहने उभी करून येथील वाहतूकही ठप्प केली, मात्र १० च्या सुमारास वाहतूक पोलिसांनी सदर मार्ग मोकळा करून दिला. आंदोलनाच्या दरम्यान एम.पी.टी तसेच आंदोलकांत समुद्रात दगडफेक झाल्याची माहिती उघड झालेली असून यात नुकसान झालेले नाही असे सूत्रांनी सांगितले. अनुचित घटना उद्भवू नये म्हणून खारीवाडा मासेमारी जेटीवर कडक पोलिस सुरक्षा तसेच एम.पी.टी च्या धक्क्यावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’ समितीचे फादर बिर्स्माक डायस यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे आंदोलन मागे घेण्णार नसल्याचे स्पष्ट केले. गोव्यातील सर्व मासेमारी गावे पारंपरिक मासेमारी गावे म्हणून जाहीर करा,एमपीटीचे कार्य सध्याच्या क्षेत्रापुरते मर्यादित ठेवा, तात्पुरती स्थगिती मिळालेल्या घरांना कायम करा, गोव्याच्या किनारपट्टीवर असलेली मच्छीमारांची घरे वैध करा, जमीनदोस्त केलेली ६६ घरे बांधून द्या व येथे ठेवण्यात आलेले सर्व राष्ट्रीय सुरक्षा औद्योगिक दलाचे जवान हटवा अशा ह्या पाच मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतसरकार कोणतीच मदत करत नसल्याने सदर आंदोलन छेडण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
दरम्यान आज संध्याकाळी समितीच्या सदस्यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिवांची भेट घेऊन त्यांच्याशी सदर पाच मागण्या ठेवल्या असता मुख्यमंत्री गोव्यात नसून ते आल्यानंतर सदर मागण्या त्यांच्यासमोर ठेवण्यात येणार असे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज पासून बोलावण्यात आलेले आंदोलन येणार्‍या काही दिवसात आणखीन आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळालेले असूनउद्या सदर आंदोलनात भाजी मार्केटातील व्यावसायिक तसेच इतर काही जण भाग घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, आज संध्याकाळी मुरगाव उपजिल्हाधिकार्‍यांनी वास्को पोलिसांसोबत खारीवाडा इफेक्टेड पीपल्सची बैठक बोलावली होती. यावेळी हे आंदोलन मागे घ्या असे पोलिसांनी समितीला सांगितले मात्र मुख्यमंत्रीच याबाबत काहीसांगत नसल्याने हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे समितीने सांगितले.
‘एम.पी.टी’कडून अनेक वेळा येथील जनतेला सतावण्यात आलेले असून येत्या काळात त्यांच्या अनेक कृत्यांबद्दल जनता रस्त्यावर येणार आहे. ‘एम.पी.टी’ आपल्या कायदेशीर कामकाजाचा ढोल वाजवत असते, मात्र त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या बेकायदा कृत्यांची कोण दखल घेणार असा प्रश्‍न मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी केला. खारीवाडाप्रकरणी सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन येथील जनतेच्या हिताचा विचार करणे एकदम गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आमदार श्री. नाईक यांनी व्यक्त केली.

No comments: