Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 15 April, 2011

जुझेंचा पाय खोलात!

मुरगाव पालिकेकडूनही पोलिस तक्रार

वास्को, दि. १४ (प्रतिनिधी)
महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी मुरगाव नगरपालिकेची जागा बेकायदा पद्धतीने आपल्या तसेच आपल्या तीन भावांच्या नावे केल्याचे प्रकरण आता अधिकच रंगू लागले असून आज या प्रकरणी मुरगावच्या नगराध्यक्षा सौ. सुचिता शिरोडकर यांनी जुझेंविरोधात वास्को पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.
काल संध्याकाळी मुरगाव नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत डिसोझा यांच्यावर सदर घोटाळा प्रकरणाबाबत तक्रार नोंद करण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला होता. त्यानुसार, आज त्यांच्यासह त्यांच्यासह त्यांचे बंधू पास्कॉल, क्लेमेन्त व जुझे निक्लाव यांच्याविरुद्ध तक्रार नोंद करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी वास्कोचे आमदार तथा राज्याचे महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी खारीवाडा येथील मुरगााव पालिकेची १०२ चौरस मीटर जागा आपल्या तसेच इतर तीन बंधूंच्या नावावर केल्याचे प्रकरण उघडकीस येताच हा विषय चर्चेचा ठरला होता. काल पालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती व जुझेंविरुद्ध पोलिस तक्रार तसेच त्यांचे बंधू नगरसेवक पास्कॉल व पत्नी नॅनी यांना अपात्र करण्याचा ठराव बहुमताने संमत केला होता. आज या ठरावाची अंशतः अंमलबजावणी करण्यात आली.
जुझेंविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत महसूल खात्यातर्फे घोटाळा करण्यात आल्याचे नमूद करून डिसोझा यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. लेखी तक्रारीसोबत कालच्या ठरावाची प्रतही जोडण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी संपूर्ण चौकशी करूनच पुढील पावले उचलण्यात येतील, असे वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन निगळे यांनी सांगितले.

No comments: