Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 15 April 2011

मलेरिया सर्वेक्षकप्रश्‍नी सोमवारी निर्णय

मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन, तरीही उपोषण सुरूच

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
सेवेत कायम करावे म्हणून गेल्या ७ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मलेरिया कर्मचार्‍यांना अखेर आज शुक्रवारी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या शासकीय बंगल्यावर पाचारण केले व त्यांना सेवेत कायम करण्याबाबत सोमवारी बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनांचा पूर्वानुभव असलेल्या मलेरिया कर्मचार्‍यांनी जोपर्यंत या संदर्भात लेखी आदेश हातात मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, हा पवित्रा कायम ठेवला आहे.
आरोग्य खात्यात गेली १२ ते १५ वर्षे मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करणारे ५९ कर्मचारी आरोग्य संचालनालयासमोर ७ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकारने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. आज आठव्या दिवशी मात्र मुख्यमंत्र्यांना या कर्मचार्‍यांना आपल्या बंगल्यावर चर्चेसाठी पाचारण केले व त्यांच्या मागणीविषयी सोमवारी निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या कर्मचार्‍यांची दखल का घेतली नाही असे पत्रकारांनी विचारता, सदर कर्मचारी उपोषणाला का बसलेत हेच आपल्याला ठाऊक नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यापूर्वीच्या आश्‍वासनाची आठवण करून देताच, सोपस्कार पूर्ण होण्यास अवधी लागतोच, अशी सबब त्यांनी सांगितली.
उपोषण सुरूच राहणार
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ऍड. सुभाष सावंत, सुदेश कळंगुटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला सोमवारी या प्रकरणी निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिलेले असले तरी लेखी आदेश मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असे मलेरिया कर्मचारी संघटनेच प्रमुख प्रेमदास गावकर यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांची धमकी?
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चाललेल्या कुजबुजीनुसार, मुख्यमंत्री आज या कर्मचार्‍यांची आरोग्य संचालनालयाजवळ भेट घेणार होते. मात्र, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांनी तसे केल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी धमकी दिली. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांनी या कर्मचार्‍यांची आपल्या बंगल्यावर भेट घेण्याचा निर्णय घेतला.

No comments: