कॉंग्रेसमधील दबावगट पुन्हा सक्रीय
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
विदेशी चलन तस्करी प्रकरणाची गंभीर दखल कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतल्याने आपले मंत्रिपद वाचवण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांनी जोरदार ‘लॉबींग’ चालवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. चर्चिल आलेमाव व इतर काही आमदारांना सोबत घेऊन बाबूश यांनी आपल्या विरोधातील कारवाई टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले असून बाबूशच्या मंत्रिपदाला हात लावाल तर सरकार पाडू, अशी गर्भित धमकीच या गटाने मुख्यमंत्री दिगंबर यांच्यापर्यंत पद्धतशीरपणे पोचवल्याची खबर आहे.
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्ध ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई कस्टम्सने तक्रार नोंदवल्याने दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राज्यात भाजपने या विषयावरून रान उठवले आहे. या विषयी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी जगमीतसिंग ब्रार हे आज गोव्यात दाखल होणार होते; पण त्यांची भेट लांबणीवर पडल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. दरम्यान, बाबूश यांचे मंत्रिपद काढून घेण्यात येऊ नये यासाठी कॉंग्रेसच्या काही मंत्री व आमदारांनी एक गट स्थापन करून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर दबाव टाकण्याचे सत्र आरंभले आहे. बाबूश यांच्या मंत्रिपदाला हात लावल्यास सरकार गडगडेल, असाच संदेश त्यांनी श्रेष्ठींपर्यंत पोचवून बाबूश यांना पाठीशी घालण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. आज त्यासंबंधी पणजीत एका बड्या हॉटेलात या नेत्यांची गुप्त बैठक झाल्याचीही माहिती मिळाली आहे.
Friday, 15 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment