Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 13 April 2011

पैंगीणीत दोन मंदिरे फोडली!

नरसिंह, नवदुर्गा मंदिरांतून ५ लाखांचा ऐवज लंपास

काणकोण दि. १२ (प्रतिनिधी)
ऐन रामनवमी उत्सवाच्या पूर्वसंध्येला पैंगीण - महालवाडा येथील जवळजवळ असलेल्या दोन प्रसिद्ध देवस्थानांत चोरट्यांनी दोन धाडसी चोर्‍या करून काणकोण तालुक्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. येथील नरसिंह देवस्थानातील ३,०५,३०० रुपयांचा तर नवदुर्गा देवस्थानातील २,००,००० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी हातोहात पळवला आहे.
काणकोण पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीच्या या घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या. मंगळवारी सकाळी हे प्रकार उघडकीस आल्यानंतर उपअधीक्षक रोहिदास पत्रे, निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी श्‍वानपथकासह घटनास्थळी भेट देऊन तपास केला. मात्र चोरांचा कोणताही सुगावा त्यांना रात्री उशिरापर्यंत लागलेला नव्हता.
सविस्तर माहितीनुसार, पैंगीण बाजारापासून अडीच ते तीन किलोमीटरवर असलेल्या महालवाडा या ठिकाणी नरसिंह देवस्थान आहे. हल्लीच फेब्रुवारी महिन्यात पर्तगाळ स्वामी महाराजांच्या हस्ते या मंदिरात विधिवत या मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रात्रौ ३.३० च्या दरम्यान नेहमीप्रमाणे काणकोण पोलिस गस्तीवर असता त्यांना या देवळाचे दरवाजे उघडे दिसले. त्वरित पोलिसांनी जवळच असलेल्या घरातील महाजन फ. य. प्रभुगावकर यांना रात्रौ ४ वाजता उठवून सदर घटनेची माहिती दिली. लगेच सर्व समिती सदस्यांना कळविण्यात आले. या देवळाच्या दोन दरवाजांना असलेली दोन्ही कुलुपे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला व गर्भकुडीचे कुलूप तोडून देवतांचे दोन मुखवटे, उत्सवमूर्तीची प्रभावळ बाहेर आणून प्रतिमा निखळली, उत्सवमूर्तीचे चांदीचे मुखवटे, पितळीची आरती, दोन माळा व रोख रुपये ४,००० असा ऐवज चोरट्यांनी पळवला, अशी माहिती महाजन उदय प्रभुदेसाई यांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी तेथून साधारण एक किलोमीटरवर असलेल्या नवदुर्गा देवालयाचीही पाहणी केली असता तिथेही चोरट्यांनी हात दाखवल्याचे त्यांना दिसून आले. या ठिकाणी देवीचे सर्व सोन्याचे अलंकार, मुखवटे आदी मिळून साधारण सहा लाख रुपयांची चोरी झाल्याचे महाजनांचे म्हणणे आहे. मात्र काणकोण पोलिसांनी नरसिंह देवस्थानात चांदी व तांब्याच्या वस्तू मिळून ३,०५,००० तर नवदुर्गा देवस्थानात आठ बांगड्या, सोनसाखळी, हार व दोन मुकुट मिळून रु. २,००,००० ची चोरी झाल्याचे सांगितले. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत या देवस्थानांत काही भाविक उपस्थित होते. त्यामुळे या चोर्‍या रात्री १२.३० ते ३च्या दरम्यान झाल्या असाव्यात असा पोलिसांचा कयास आहे. चोरट्यांनी गाडीतून पळ काढला असावा व त्यामुळेच श्‍वानपथकाला त्यांचा माग लागला नाही, असे निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी सांगितले.
गेल्या आठ एप्रिल रोजी पैंगीण येथीलच परशुराम देवस्थानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता.तेव्हा चोरांनी देवालयाच्या दोन दरवाजांची कुलुपे तोडली होती. मात्र गर्भकुडीचे टाळे तोडण्यात त्यांना अपयश आले होते. त्यावेळी दुधाचा व्यवसाय करणारा एक नागरिक तेथे पोहोचल्याने चोरांनी पलायन केले होते. चोर बहुधा पळून जाण्यास सोपे जावे म्हणून दोन दारांची कुलुपे तोडत असावे, असा कयास गोविंद प्रभुगावकर यांचे म्हणणे आहे.४

No comments: