पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)
मडगाव बसस्थानकावर अमली पदार्थ देण्यासाठी आलेल्या ईश्वर ईची बुद्धा (४६)या नेपाळी इसमाला सोमवारी रात्री १० वाजता अमली पदार्थ विरोधी पथकाने मुद्देमालासकट ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ११ हजार ५०० रुपये किमतीचा १.११५ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, एक व्यक्ती गोव्यात चरस देण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार मडगाव बसस्थानकावर सापळा रचण्यात आला. रात्री बस स्थानकात संशयास्पदरीत्या फिरताना सदर व्यक्ती दिसल्याने त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. यावेळी झडती घेतली असता त्याच्या पाठीवरील बॅगेत चरस आढळून आला. मडगाव भागातील एका व्यक्तीला हा चरस देण्यासाठी आपण आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
ईश्वर झाशीहून गोव्यात आला होता. इथे त्याच्याकडून हा चरस कोण घेणार होता, याची चौकशी पोलिस करीत आहेत. सदर छापा अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपअधीक्षक नरेश म्हामल आणि उपनिरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताकांत नायक यांनी टाकला. यात पोलिस शिपाई सचिन सावंत, सुशांत पागी आणि चंदन अर्धरोट्टी यांनी सहभाग घेतला. या विषयीचा पुढील तपास उपनिरीक्षक नायक करीत आहेत.
Wednesday, 13 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment