म्हापसा व कुडचडे, दि. १२ (प्रतिनिधी)
राज्यात आज दि. १२ रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत दोघांना आपले प्राण गमवावे लागले. शिरसई येथील खाण जेटीवरून मुख्य रस्त्याकडे येणार्या ट्रकाने रस्त्याशेजारी फोनवर बोलत थांबलेल्या कैलासनगर - अस्नोडा येथील युवकाला चिरडले तर थोरलेमळ - काले येथे कदंब बसला जोरदार धडक दिल्याने चिरेखाणीवर काम करणारा दुचाकीस्वार ठार झाला.
शिरसईत खनिज वाहतुकीचा बळी
शिरसई भागात अनियंत्रित पद्धतीने होत असलेल्या खनिज वाहतुकीने आज एक बळी घेतला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिरसई येथील खाण जेटीवरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी झपकन वळलेल्या जीए ०३ टी ६४९९ या क्रमांकाच्या ट्रकाने तेथेच रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसून फोनवर बोलत असलेल्या कैलासनगर - अस्नोडा येथील राधेश के. चल्लप्पन (२६) या युवकाला ठोकरले. त्यानंतर ट्रकाचे मागील चाक अंगावरून गेल्याने तो चिरडला जाऊन जागीच ठार झाला.
या प्रकरणाची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक तुळशीदास धावस्कर घटनास्थळी पोहोचले. अपघाताचा पंचनामा करून त्यांनी राधेश या मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळीला पाठवून दिला. या प्रकरणी केरळ येथील महंमद रेहमान मापी या ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
मयत राधेश के. चल्लप्पन याचे कुटुंब मूळ मणिपूर येथील असून त्याचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गोव्यातच स्थायिक झाले आहेत. राधेश याचा जन्मही गोव्यातच झाला होता. या दुर्घटनेमुळे अस्नोडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनियंत्रित खनिज वाहतुकीबद्दल संतप्त प्रतिक्रियाही नोंदवल्या जात आहेत.
कालेत एक ठार, एक गंभीर
दरम्यान, थोरलेमळ - काले येथे आज दुपारी भरवेगाने धावणार्या दुचाकीने कदंब बसला समोरून जोरदार धडक दिल्याने मूळ विजापूर व सध्या काले येथील चिरेखाणीवर काम करणारा लक्ष्मण नामक कामगार जागीच ठार झाला तर मागे बसलेला मल्लेश हा गंभीर जखमी झाला आहे.
आज दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. कालेहून सावर्डेला जाणार्या जीए ०१ एक्स ०४७९ क्रमांकाच्या कदंबला येथील वळणावर जीए ०२ क्यू ३२४७ या दुचाकीने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीचालक लक्ष्मण याचे डोके बसवर धडकल्याने काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला तर मागे बसलेला मल्लेश हा सरळ जाऊन बसच्या समोरील काचेवर आपटला व दूर फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही धडक एवढी जबरदस्त होती की टायर फुटल्याचा मोठा आवाज आला व दुचाकीचा चक्काचूर झाला. आवाजाने आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले. गंभीर अवस्थेतील मल्लेशला आधी कुडचडे आरोग्यकेंद्रात व नंतर बांबोळीला हालवण्यात आले आहे. कुडचडे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. याच रस्त्यावरून खनिज वाहतूक होत असल्याने तिथे गतिरोधकांची मागणी ग्रामस्थांनी केली होती. तसेच सदर वळण अरुंद असल्याने त्याचे रुंदीकरण केले जावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Wednesday, 13 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment