Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 31 May 2011

जिल्हाधिकार्‍यांच्या निलंबनानंतर ‘उटा’चे धरणे मागे

गावोगावी लढा सुरूच राहणार
देशपांडेंच्या निलंबनाची मागणी

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास दक्षिण गोवा जिल्हाधिकारी जबाबदार असल्याच्या आरोपानंतर आज जे पी. नाईक यांना निलंबित केल्याचा आदेश सरकारने काढला. सरकारच्या या आदेशानंतर स्व. मंगेश व स्व. दिलीप यांच्या नातेवाइकांनी दोन्ही मृतदेहांच्याशवचिकित्सेस अनुमती दिली. दरम्यान, पणजीच्या आझाद मैदानावर धरलेले धरणे मागे घेऊन यापुढे अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या ठिकाणी शोकसभा घेऊन हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याची घोषणा आज ‘उटा’ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी आझाद मैदानावर पत्रपरिषद घेऊन केली. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार महादेव नाईक, वासुदेव मेंग गावकर, रमेश तवडकर, माजी आमदार बाबूसो गावकर, डॉ. उदय गावकर, कांता गावडे, धाकू मडकईकर, मधू गावडे व संघटनेचे अन्य कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी अद्याप मान्य केली नसली तरी, जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांना निलंबित करण्याच आदेश दुपारी काढण्यात आला. मंगेश आणि दिलीप या दोघा तरुणांचा खूनच करण्यात आलेला आहे. त्यांच्या खुन्यांना त्वरित अटक केली जावी. गुंडगिरी संपवण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या तपासकामावर समाधानी नसल्याचे श्री. वेळीप यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे, या प्रकरणाची चौकशी केवळ उच्च न्यायालयाच्या निवृत्त किंवा सेवेत असलेल्या न्यायाधीशांमार्फतच केली जावी, अशीही जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. दोन्ही हुतात्म्यावर अंत्यसंस्कार करून प्रत्येक गावा शोकसभा घेतल्या जाणार आहेत. सरकारने खुन्यांवर कठोर कारवाई न केल्यास त्यानंतर उमटणार्‍या प्रतिक्रियेला राज्य सरकारच जबाबदार असेल, असा जळजळीत इशारा यावेळी श्री. वेळीप यांनी दिला.
आत्माराम देशपांडेंना निलंबित करा...
पोलिस प्रवक्ते तथा अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी लोकांनी पुन्हा भडकावण्याचा प्रयत्न केला असून त्यांना त्वरित निलंबित करण्याची जोरदार मागणी ‘उटा’ संघटनेने केली. श्री. देशपांडे यांना तसे बोलायला कोणी भाग पाडले याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी मनोहर पर्रीकर यांनी केली. ‘उटा’चे आंदोलक दारू पिऊन आले होते, त्यामुळे त्यांच्या नेत्याचा स्वतःवर ताबा राहिला नाही, असे वक्तव्य देशपांडे यांनी केले होते. किती लोक पिऊन आले होते, पोलिस दारू घेत नाहीत का, असा प्रश्‍न करून पोलिसांनी किती दारूच्या बाटल्या जप्त केल्या, सर्व आंदोलनकर्ते दारूच्या नशेत होते का, अशा प्रश्‍नांची सरबत्तीच पर्रीकर यांनी केली. तसेच, न्यायालयीन चौकशीला पोलिस घाबरल्यानेच आंदोलक तीन पूल उडवून देणार होते, असे वक्तव्य पोलिसांनी केल्याचा ठपका पर्रीकरांनी ठेवला.
८ हजार लोक आंदोलन करीत असताना तेथे केवळ १५० पोलिस का तैनात करण्यात आले, असा प्रश्‍न श्री. पर्रीकर यांनी केला. मंगेश गावकर याला आधी मारूनच आगीत टाकले याची पूर्ण खात्री पटली असल्याचाही दावा त्यांनी केला. आमदार रमेश तवडकर यांनाही त्या आगीत टाकण्याचा समाजकंटकांचा बेत होता. घटनास्थळी आदर्श भवनाचे शटर मोडण्यासाठी आणलेले लोखंडी रॉडही तेथे पडले होते. तेही गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी जप्त केलेले नाहीत. पोलिसांनी पंचनामाही केलेला नाही. दिलीप याला गुदमरून मारण्यात आले, असाही दावा पर्रीकरांना केला. तसेच, प्रकाश वेळीप व या भागातील शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी ‘आदर्श भवन’ला आग लावण्यात आली अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
हिंमत असेल तर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी द्या..
भूमिपुत्रांवर या कॉंग्रेसने अतोनात अत्याचार आणि अन्याय केला आहे. जोपर्यंत कॉंग्रेस सत्तेवर असणार तोवर अनुसूचित जातीवर अन्यायच होणार. त्यामुळे नेते मंडळींनी तोंडच्या वाफा न दवडता हिंमत असेल तर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी द्यावी, असे आवाहन आमदार रमेश तवडकर यांनी केले.
मृतदेहाचा पुन्हा पंचनामा...
पोलिसांनी केलेला पंचनामा फेटाळून लावत आज (सोमवारी) उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी नव्याने पंचनामा केला. यावेळी पंचनाम्याचे छायाचित्रीकरणही करण्यात आले. मंगेश याचा एक हात आणि एक पाय कापलेल्या स्थितीत असल्याने त्याची ओळख पटवण्यास नातेवाइकांना वेळ लागला, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मानवी अधिकार कायद्याच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार पंचनामा झाल्यानंतर त्या दोन्ही मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली. शवचिकित्सेचा अहवाल अद्याप उघड करण्यात आलेला नाही.

No comments: