Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 2 June 2011

सोमवारचा बंद यशस्वी करा

खोर्लीतील भाषा सुरक्षा मंचाच्या सभेत आवाहन

म्हापसा, दि. १ (प्रतिनिधी)
माध्यमप्रश्‍नी सरकारने घेतलेला निर्णय कोणत्या जाणकारांना विचारून घेतला ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे असे आव्हान भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना दिले. त्याचप्रमाणे सोमवार ६ जून रोजी पुकारलेला गोवाबंद यशस्वी करा असे आवाहन मंचातर्फे करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाषाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
खोर्ली म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाच्या सभागृहात आज भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे आयोजित केलेल्या बैठकीत सोमवार ६ जून रोजी पुकारण्यात आलेल्या गोवा बंदसाठी कोणत्या प्रकारे जनजागृती करावी व कोणत्या पद्धतीने बंद यशस्वी करावा या विषयावर चर्चा झाली. यावेळी श्रीमती काकोडकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य सुभाष वेलिंगकर, साहित्यिक विष्णू सूर्या वाघ, नरेंद्र आजगावकर, पुंडलिक नाईक, नागेश करमली, माधव देसाई, सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती काकोडकर पुढे म्हणाल्या की, गोव्याचे भ्रष्ट मुख्यमंत्री कामत हे धादांत खोटे बोलत आहेत. मंचाला चर्चा करण्यासाठी बैठकीला बोलावले असल्याचे वर्तमानपत्रातून ते जाहीरपणे सांगतात. हे विधान एकदम खोटे आहे. माध्यमप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी चर्चा घडावी असा चुकूनही उल्लेख केलेला नाही. माध्यमप्रश्‍न अंगलट येत असल्याने मुख्यमंत्री आता वाट्टेल तसे खोटे बोलत असल्याचा आरोप श्रीमती काकोडकर यांनी केला.
श्री. करमली म्हणाले की, गोव्यात सध्या शिक्षणाची जी स्थिती आहे ती तशीच ठेवावी. कामत सरकारने माध्यमप्रश्‍नावर व्यापक आंदोलन होण्याअगोदर आपला निर्णय बदलावा अशी मागणी केली. प्राचार्य वेलिंगकर यांनी मंचाच्या तालुका प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रत्येक प्रतिनिधीने आपल्या तालुक्यात पत्रके काढून बैठक घ्यावी व प्रत्यक्ष आमदाराची भेट घ्यावी. वर्तमानपत्रांतून विविध लेख लिहून जागृती करावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना, पालकांना संपाची जाणीव करून द्यावी. इंग्रजी माध्यमामुळे पुढे कोणती भयानक परिस्थिती उद्भवेल हे विषद करावे असे आवाहन केले.
यावेळी श्री. विष्णू वाघ म्हणाले की, कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. जनतेच्या पैशांतून सांस्कृतिक खाते चालविले जाते. त्यांच्याच पैशांतून पुरस्कार दिले जातात आणि आपल्या संस्कृतीशी नाते असलेल्या मातृभाषेचा गळा घोटण्याचे काम श्री. कामत करत आहेत. त्यामुळेच मी मला दिलेला पुरस्कार मी परत करण्याचा मनोदय जाहीर केला. मात्र याच सांस्कृतिक मंत्र्याला याचे काहीही नाही. तसेच मायभाषेच्या आपल्या सांस्कृतिक अभिमानापोटी ते पुरस्कार परत करत आहेत याचेही त्यांना दुःख वाटले नाही. उलट पुरस्कार खुशाल परत करा असे आवाहन केले. मी कॉंग्रेसचा घटक आहे. पण तरीही कॉंग्रेसच्या विरोधात बोलत आहे. कॉंग्रेसने माझे काय करायचे ते करावे मात्र मी माझा आवाज बंद करणार नाही असे ठामपणे सांगितले.
यावेळी साहित्यिक पुंडलिक नाईक यांचेही भाषण झाले. उपस्थितांपैकी रामकृष्ण डांगी, सूर्यकांत नाईक, रत्नपाल साळकर, आनंद शिरगावकर, दिलीप गावडे, ऍड. शिवाजी देसाई, लक्ष्मीकांत शेटगावकर, सदानंद नार्वेकर, कांता गावकर, श्रीपाद येंडे, सुरेंद्र शेट्ये, जयेश थळी यांचीही मुख्यमंत्री कामत व कॉंग्रेस सरकार यांचा निषेध करणारी भाषणे झाली. सूत्रसंचालन वल्लभ केळकर यांनी केले.

No comments: