• पंतप्रधानांकरवी राज्यपालांकडून अहवाल मागवणार
• भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत मुद्दा उपस्थित होणार
• संसदेत ‘उटा’चे आंदोलन गाजणार
पणजी, दि. २ (प्रतिनिधी)
पंतप्रधानांची भेट घेऊन बाळ्ळी जळीतकांडाचा अहवाल राज्यपालांकडून मागवून घेण्याची विनंती करणार असल्याचे लोकसभेतील भाजप उपनेते तथा प्रदेश भाजपचे राष्ट्रीय निवडणूक प्रभारी गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केले.गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकार राज्य करण्याच्या अजिबात लायकीचे राहिलेले नाही, असा घणाघात यावेळी श्री. मुंडे यांनी केला. आज पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. मुंडे यांनी या एकूणच प्रकरणी आपली चीड व्यक्त केली.
आदिवासी समाजाचे प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या आदर्श सोसायटीला आग लावून तिथे दोन आदिवासी युवकांना जिवंत जाळण्याचे क्रौर्य घडत असताना पोलिस बघ्याची भूमिका घेतात, हे राज्याच्या अनियंत्रित कायदा सुव्यवस्थेचेच द्योतक आहे. गोव्यातील आदिवासींवरील या अन्यायाबाबत उद्या ३ रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत चर्चा होईलच परंतु जुलै महिन्यात सुरू होणार्या संसदीय अधिवेशनात हा विषय प्रामुख्याने चर्चेला घेतला जाईल, अशी घोषणाही श्री. मुंडे यांनी केली.
मुंडे यांची घटनास्थळाला भेट
बाळ्ळी येथील घटनास्थळाची पाहणी करताना आदर्श सोसायटी व आंचल इमारतीची समाजकंटकांनी लावलेल्या वाताहतीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी श्री. मुंडे यांनी सांगितले की, सरकारने वेळीच जर खंबीरपणे पावले उचलली असती तर दोन बळी व सारा विद्ध्वंस वाचला असता. पण हे सरकारने न केल्याने खरे तर सरकारवरच ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. यावेळी मंगेशचे काका जानू गावकर म्हणाले की आदिवासी लोकांकरिता आपल्या पुतण्याने बलिदान दिले. त्याच्या मारेकर्याला योग्य दंड मिळावा अशी गावकर कुटुंबाची इच्छा आहे.यावेळी श्री. मुंडे यांच्यासोबत उटाचे नेते प्रकाश वेळीप, पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर, आमदार वासुदेव मेंग गावकर, आमदार रमेश तवडकर, खासदार श्रीपाद नाईक, उटा नेते गोविंद गावडे, विशांत गांवकर, समाजसेवक शांताजी नाईक गावकरउपस्थित होते.
पोलिस अधिकार्यांवरही गुन्हे नोंदवा
बाळ्ळी येथील या घटनेला सात दिवस पूर्ण झाले तरी पोलिसांनी अद्याप याठिकाणचे पुरावे गोळा केलेले नाहीत. याठिकाणच्या रक्ताचे सडे तसेच इतर वस्तूंची फोरेन्सीक चाचणीही केली नाही. ही एकूणच गोष्ट आश्चर्याचीच म्हणावी लागेल व त्यामुळे या घटनेचे पुरावे नष्ट करण्यासाठीच हा हलगर्जीपणा केला जात नाही ना, असा सवाल खडा होतो, असेही श्री. मुंडे म्हणाले. आदर्श सोसायटीत अडकलेल्या दोघा आदिवासी युवकांचा पाठलाग करून त्यांना जिवंत मारण्यात आल्याचे येथील परिस्थितीवरून स्पष्ट होते. हा प्रकार खरोखरच पोलिसांच्या डोळ्यांदेखत घडला असेल तर या पोलिस अधिकार्यांविरोधातही ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद व्हायला हवा, असेही श्री. मुंडे म्हणाले. आदर्श व आंचल या दोन्हींचे मिळून सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही संस्था आदिवासी घटकांच्या कल्याणासाठीच कार्यरत होत्या व त्यामुळे त्यांना सरकारनेतात्काळ संपूर्ण भरपाई द्यावी, अशी मागणीही श्री. मुंडे यांनी केली.
‘उटा’च्या मागण्या न्याय्य
‘उटा’तर्फे सरकार दरबारी सादर केलेल्या मागण्या या न्याय्य व त्यांना घटनेद्वारे मिळालेला हक्कच आहे. या मागण्यांत राजकीय आरक्षणाचाही विषय होता. कदाचित आरक्षणाची मागणी सत्ताधारी लोकांना सहन झाली नाही व त्यामुळेच त्यांनी पूर्वनियोजित कट रचून हे आंदोलन चिरडण्याचा डाव साधला. अशा प्रकारचे जळीतकांड गोव्यात पहिल्यांदाच घडलेले असताना व खुद्द राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू हे घटनास्थळाला भेट देत असताना मुख्यमंत्री अथवा सरकारचा एकही मंत्री तिथे अजूनही भेट देत नाही, याला नेमके काय म्हणावे, असा सडेतोड प्रश्नही श्री. मुंडे यांनी उपस्थित केला. बळी गेलेल्या आदिवासी कुटुंबीयांना राज्यपाल आपल्या कोषातून आर्थिक मदत जाहीर करतात पण सरकार मात्र याप्रकरणी चिडीचूप राहते, यावरूनच सरकारचा छुपा डाव उघड होतो, असा टोलाही श्री. मुंडे यांनी हाणला.
जिवंत जाळणारे गुंडच!
बाळ्ळीवासीयांना गुंड संबोधल्याचा निरर्थक दावा करून एक गटाने विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यावर आगपाखड करण्याची कृती म्हणजे मूळ विषयावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचाच प्रयत्न असल्याची टीका गोपीनाथ मुंडे यांनी केली. बाळ्ळीच्या हिंसेत ज्या समाजकंटकांनी ‘उटा’ आंदोलकांवर हल्ला केला व दोघा निरपराध आदिवासी युवकांचा बळी घेतला त्यांना गुंड नाही तर काय म्हणावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इथे एखादा गाव, जात, जमात आदींबाबत कुणालाच आक्षेप घेण्याचे कारण नाही. फक्त एखाद्याला जिवंत जाळण्याची कृती ही गुंडच करू शकतात व त्यामुळेच अशा समाजकंटकांनाच उद्देशून हा उच्चार करण्यात आला होता. संपूर्ण बाळ्ळीवासीयांनाच गुंड संबोधण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरणही श्री. मुंडे यांनी दिले.
दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी
एक लाखाची मदत
काणकोण व कुंकळ्ळी (प्रतिनिधी)
गोपीनाथ मुंडे यांनी आज ‘उटा’ आंदोलनात बळी पडलेल्या मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली. या दोन्ही कुटुंबीयांना भाजपतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत त्यांनी दिली. या आंदोलनात शहीद झालेल्या दोन्ही कुटुंबीयांना कायमस्वरूपी आर्थिक मदत मिळवून देऊ, असे आश्वासनही श्री. मुंडे यांनी दिले. दिलीप वेळीपची छोटी मुलगी व मंगेश गावकर याच्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च पक्षातर्फे उचलण्यात येईल, असा शब्दही त्यांनी दिला. तसेच आवश्यकता पडल्यास दिलीपच्या पत्नीसाठी नोकरीचीही व्यवस्था केली जाईल असे त्यांनी सांगितले.
Friday, 3 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment