दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
पणजी, दि.३ (प्रतिनिधी): तब्बल आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अखेर आपल्या मनाची तयारी केलीच. ‘उटा’ आंदोलनात बळी पडलेले मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या कुटुंबीयांना आज मुख्यमंत्र्यांनी सांत्वनपर भेट दिली व त्यांच्यामागे सरकार ठामपणे उभे राहणार, असा दिलासाही त्यांना दिला. आदिवासी कल्याणमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस यांच्यासमवेत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश या भेटीनिमित्ताने वितरित केले.
काणकोण तालुक्यातील गावडोंगरी येथील मंगेश गांवकर व केपे मोरपिर्ल येथील दिलीप वेळीप यांच्या घरी मुख्यमंत्री दिगंबर कामत पोहोचले. बाळ्ळी येथे २५ रोजी घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून या कठीण प्रसंगी आपण व आपले सरकार या दोन्ही कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे ते म्हणाले. ‘उटा’तर्फे सरकार दरबारी ठेवलेल्या सर्व मागण्यांना तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याचेही ते म्हणाले. अर्थसंकल्पातील १२ टक्के भाग हा फक्त आदिवासी कल्याणासाठी खर्च केला जाईल. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पदांची भरती करण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवण्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले. पिडीत गावकर व वेळीप कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय नोकरीसाठी पात्र असल्यास त्याला प्राधान्य देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्य केले.
कामत यांनी या दौर्यात बाळ्ळी येथे प्रकाश शंकर वेळीप यांच्या आदर्श सोसायटी व आंचल इमारतीचीही पाहणी केली. या दोन्ही इमारतींची समाजकंटकांनी ज्या पद्धतीने वाताहत लावली ते पाहून मुख्यमंत्रीही चक्रावले. या इमारतींची दुरवस्था पाहिल्यास दोन्ही आदिवासी युवकांना कशा क्रूर पद्धतीने मारले गेले असावे याचाही अंदाज येतो, अशी प्रतिक्रियाही यावेळी उमटली. याप्रसंगी ‘उटा’ अध्यक्ष प्रकाश वेळीप हे देखील हजर होते.
Saturday, 4 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment