Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 30 May 2011

केरळमध्ये मान्सूचे दणक्यात आगमन!

नवी दिल्ली, दि. २९
जिवघेण्या उकाड्याने हैराण झालेल्या गोवेकरांना मान्सूनचे वेध लागलेले असताना यंदा नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच मान्सूनची केरळमध्ये धो धो ‘एंट्री’ झाली. आज (रविवारी) सकाळपासूनच केरळला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे किनारपट्टीतील अन्य राज्यांमध्येही जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल होण्याची चिन्हे असून, पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावणार आहेत.
येत्या ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र रविवारी पहाटेपासूनच केरळमध्ये मान्सूनने आगमनाची वर्दी दिली. गेले दोन दिवस याठिकाणी ढगाळ वातावरण होते. केरळसह दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू, अंदमान भागातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. येत्या दोन दिवसात मान्सून कर्नाटकमध्ये पोहोचेल. त्यानंतर आणखी मान्सूनचे अन्य भागांत आगमन होईल, अशी चिन्हे आहेत.
यंदाच्या वर्षी सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वेळेच्या दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाल्याने हा अंदाज खरा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने शेतकरी वर्ग आनंदला आहे. पावसामुळे खरीपाच्या पेरण्या वेळेवर सुरू होणार आहेत.

No comments: