Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 30 May 2011

पोलिस अधीक्षकांचे वक्तव्य आगीत तेल ओतणारे

पर्रीकरांची संतप्त प्रतिक्रिया

‘हे तर कोल्ड ब्लडेड मर्डरच!’



कुंकळ्ळी, दि. २९ (प्रतिनिधी)
अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले आरोप हे अत्यंत दुर्दैवी, दुर्भाग्यपूर्ण व बिनडोकपणाचे होते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज आंदोलनात मृत्यू पडलेले मोरपिर्ला येथील दिलीप वेळीप यांच्या घरी सांत्वनपर भेटीप्रसंगी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांच्या सोबत ऍड. नरेंद्र सावईकर, प्रकाश वेळीप, पक्षाचे स्थानिक सचिव महेश फळदेसाई, पक्षाचे इतर पदाधिकारी व इतर ग्रामस्थ हजर होते.
यावेळी दिलीप वेळीप यांचे कुटुंबीय तसेच शेजार्‍यांनी अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी केलेल्या बेजबाबदार आरोपांवर आपल्या प्रतिक्रिया व संताप विरोधी पक्षनेत्यांसमोर व्यक्त केल्यानंतर त्यांनी वरील प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळ्ळी व मोरपिर्ला परिसरातील परिस्थिती एक प्रकारे पूर्वपदावर येण्याच्या स्थितीत असताना पोलिसांच्या अशा प्रतिक्रिया म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखा प्रकार आहे, असेही श्री. पर्रीकर पुढे म्हणाले.
यावेळी घरच्यांनी मृतदेह असेपर्यंत कुटुंबात अन्नग्रहण वर्ज असल्याचे सांगून दिलीपचा मृतदेह मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली असता, उद्यापर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह ताब्यात मिळण्याची व्यवस्था करू असे आश्‍वासन त्यांनी दिले.
दिलीप यांच्या कुटुंबावर ओढवलेला प्रसंग दुर्दैवी असून कुटुंबाची भविष्यात आबाळ होऊ नये यासाठी पक्षातर्फे सर्वते प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. आंचलच्या अग्नीकांडात दोन युवकांचे जाळून झालेले मृत्यू यासाठी मानवाधिकार संस्थेकडे तक्रार कुटुंबीयांतर्फे केली जाणार आहे. तसेच आग लावून मालमत्ता नष्ट करणे यासारख्या घटनेचा वर्गीकृत जमाती अत्याचार कायद्यानुसार प्रकरण हाताळले जाणार असल्याचे श्री. पर्रीकर यांनी एका प्रश्‍नावर उत्तर देताना सांगितले.
त्यानंतर श्री. पर्रीकर यांनी बाळ्ळी येथे आदर्श सोसायटी भवनाला भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी आदर्श सोसायटीचे चेअरमन प्रकाश वेळीप यांनी संपूर्ण माहिती दिली. तत्पूर्वी मनोहर पर्रीकर यांनी, जिथे मंगेश व दिलीप यांचा जाळून खून केला गेला त्या आंचल भवनाला भेट देऊन पाहणी केली व दोघांचेही मृतदेह सापडलेल्या जागा पाहिल्या व परिस्थिती समजून घेतली. यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. पर्रीकर म्हणाले, की आदर्शमधली परिस्थिती पाहता हे काम राजकीय पाठबळ लाभलेल्या समाजकंटकांचे असून आंचलला लावलेल्या आगीत दोन युवकांचा मृत्यू म्हणजे अगदी पद्धतशीरपणे केलेला ‘कोल्ड ब्लडेड खून’च आहे असे सांगितले.
आदर्श व आंचलला लावलेल्या आगीसंबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश वेळीप म्हणाले, की वास्तविक वर्गीकृत जमातीचेे आंदोलन व आदर्श व आंचल सोसायट्या यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. मात्र जाणून बुजून विध्वंस व नुकसान करणे असा दुष्ट हेतू या मागे असून यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय अशी कामे होऊच शकत नसल्याचे सांगितले.

No comments: