Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 3 June 2011

कळसा प्रकल्पामुळे कणकुंबीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न

पणजी, दि. २
विठ्ठल पारवाडकर
कर्नाटक सरकारने न्यायालयाच्या धरणविरोधी आदेशानंतरही कळसा धरणासाठीच्या कालव्याचे काम कणकुंबी परिसरात जोरात सुरूच ठेवले आहे. धरण कोणत्या जागी होईल याचा अजून पत्ता नाही मात्र भयानक वाटावे असे खोल कालवे खोदण्यात आले आहेत. या कालव्यांमुळे या परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून साखळी - बेळगाव वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. कालव्यासाठी खणलेले खंदकइतके खोल आहेत की पावसाने या खंदकात पाणी भरल्यास मातीचा भराव घालून केलेला रस्ता त्यावरील वाहनासह वाहून जाण्याचा धोका आहे.
धारवाड व हुबळी परिसरातील लोकांची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सुर्ल, कणकुंबी व पारवाड या गावातील लोकांची वायंगणी शेती असलेल्या ‘कळसा’ नदीवर कर्नाटक सरकारने धरण बांधून गोव्याकडे येणारे पाणी अडवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी सुर्ल ते पारवाड पायवाटेवरील कळसा नदीवर धरणासाठीची आखणी सुरू केली. मात्र गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी या धरणास जोरदार विरोध केला. प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन या धरणाचे बांधकाम बंद करावे असा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे कळसा नदीवरील धरण बांधण्याचे काम बंद झाले. मात्र कर्नाटक सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत येथे कालवे बांधणे सुरू केले. कर्नाटक सरकारच्या या धरणप्रकल्पाची पूर्तता झाल्यानंतर कळसा नदीचे गोव्याकडे येणारे पाणी अडवून ते कणकुंबी येथील श्री माउली देवीच्या पुरातन व ऐतिहासिक मंदिराजवळ उगम पावून पुढे कर्नाटकात जाणार्‍या ‘मलप्रभा’ नदीत सोडून पुढे सदर पाणी धारवाड हुबळी या परिसरातील लोकांसाठी पुरवण्यात येणार आहे.

कणकुंबीचे अस्तित्वच धोक्यात
कर्नाटक सरकारने धरणाची जागा निश्‍चित केली नसताना माउली मंदिर परिसरात जे भव्य व खोल कालवे खणलेले आहेत ते पाहता या प्रकल्पामुळे या पुरातन मंदिराचे व या परिसरातील बाजाराचे गाव असलेल्या कणकुंबी गावचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. शेती उद्ध्वस्त करून जिकडे तिकडे उभारलेले मातीचे डोंगर व त्यामुळे परिसरातील धूळ प्रदूषणामुळे येथील लोकांचे जीवनमान त्रासदायक बनले आहे. खोदाईमुळे लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माउली मंदिरांच्या परिसराला तडे गेले आहेत. खोल खंदकामुळे गावच्या विहिरी सुकलेल्या असून नाल्यांचे पाणीसुद्धा आटलेले आहे.
रस्ता वाहून जाण्याचा धोका
कळसा नदीचे पाणी परतवण्यासाठी जे खंदक खोदण्यात आले आहेत ते फारच खोल आहेत. पणजी साखळी बेळगाव हा चोर्लाघाटातून जाणारा रस्ता या ठिकाणी पूर्णपणे खोदून त्याजागी उंच मातीचा भराव टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या खोल खंदकात पावसाचे पाणी भरल्यास हा मातीचा रस्ता वाहून जाऊ शकतो आणि दुर्दैवाने त्यावेळी या रस्त्यावर बस असेल तर ती वाहून जाऊन त्यातील प्रवाशांना जलसमाधी मिळू शकते.

No comments: