Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 3 June, 2011

प्रकाश अर्जुन वेळीप गप्प का?

मुख्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकांवर अनेकांची नजर

पणजी, दि. २ (प्रतिनिधी)
बाळ्ळी येथे २५ रोजी ‘उटा’च्या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेले मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे स्वीय साहाय्यक प्रकाश अर्जुन वेळीप हे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी समन्वय साधून होते. एवढे असूनही जिल्हाधिकार्‍यांनी घाईगडबडीत आंदोलकांवर लाठीहल्ल्याचा आदेश दिलाच कसा, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. ‘उटा’ आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रकाश अर्जुन वेळीप आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर कुठे गायब झाले, असा सवाल करण्यात येत असून त्यांनी धारण केलेल्या मौनव्रताबद्दलही अनेकांकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
‘उटा’ आंदोलनाच्या निमित्ताने आता एकामागोमाग एक नव्या गोष्टींचा उकल होत चालला आहे. मुख्यमंत्री कामत यांचे स्वीय साहाय्यक प्रकाश अर्जुन वेळीप हे स्वतः ‘उटा’च्या २५ रोजी आयोजित केलेल्या आंदोलनात पुढे होते. बाळ्ळी येथे जमलेल्या जमावाचे नेतृत्व करून मोठमोठ्याने घोषणा देण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. प्रकाश वेळीप हे मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक असताना प्रत्यक्षात ते आंदोलनात सहभागी होऊ शकतात काय, हा एक नवीन वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. दरम्यान, वेळीप यांनी आपल्या सरकारी पदाला न जुमानता आपल्या बांधवांच्या हक्कांसाठी या आंदोलनात भाग घेतला असण्याचीच जास्त शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रकाश अर्जून वेळीप यांनी स्वतःहून सक्रिय राजकारणात उतरण्याची काही काळापूर्वी घोषणा केली होती. खुद्द केपेतून कॉंग्रेस तिकिटासाठी दावा करणार असल्याचे विधानही त्यांनी केल्याने स्थानिक आमदार बाबू कवळेकर व प्रकाश अर्जून वेळीप यांच्यातील संबंध बरेच ताणले गेले होते.
दरम्यान, केपे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ‘एसटी’ लोकांचा समावेश आहे व त्यामुळे ते स्वतः या समाजाचे घटक असल्याने त्यांनी वेळोवेळी ‘उटा’ च्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवून प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न केला आहे. केपे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवरही निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे, अशी टूम त्यांच्याच काही समर्थकांनी मध्यंतरी उठवली होती. या पार्श्‍वभूमीवर बाळ्ळी येथे ‘उटा’चे आंदोलन हिंसक बनण्यास स्थानिक राजकीय वैमनस्य कारणीभूत ठरले तर नाही ना, असाही प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. आमदार रमेश तवडकर यांच्यावरील हल्ला, प्रकाश शंकर वेळीप यांच्या आदर्श सोसायटी व आंचल इमारतीला लावलेली आग व त्यात दोन आदिवासी युवकांना लक्ष्य करून त्यांचा बळी घेण्याचा प्रकार हा राजकीय वैमनस्याचाच परिपाक तर नसावा ना, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.
दरम्यान, या आंदोलनातील एक नेते या नात्याने प्रकाश अर्जुन वेळीप यांनी झालेल्या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया देणे गरजेचे होते, असे मत आता काही आंदोलक व्यक्त करीत आहेत. आझाद मैदानावरील निषेध धरणेवेळी त्यांनी हजेरी लावली खरी परंतु प्रसारमाध्यमांपासून मात्र त्यांनी चार हात दूर राहणेच पसंत केले. प्रकाश अर्जुन वेळीप हे सरकारी सेवेत असल्याने त्यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलणे उचित ठरले नसते, हे जरी खरे असले तरी मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक या नात्याने व या संपूर्ण आंदोलनाचे प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल आपली प्रतिक्रिया देण्याची गरज होती. मुळात या संपूर्ण घटनाक्रमाचे कथन त्यांनी मुख्यमंत्री कामत यांना तरी केले आहे काय, असाही सवाल होतो आहे. याप्रकरणी नेमकी काय परिस्थीती उद्भवली म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी लाठीहल्ल्याचा आदेश दिला व हा आदेश देण्यापूर्वी त्याची कल्पना प्रकाश अर्जुन वेळीप यांना मिळाली होती काय, असाही प्रश्‍न विचारला आता विचारला जात आहे.

No comments: