Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 3 June, 2011

मानव अधिकार आयोगाची पोलिस महासंचालकांना नोटीस

कावरे खाण प्रकरण

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) ः कावरे खाणीच्या विरोधात आंदोलन करणार्‍या गिरीवासी लोकांवर लाठीमार करून मानवी हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव आणि पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. गोवा राज्य मानवी हक्क आयोगाने या नोटिसा बजावलेल्या असून येत्या चार आठवड्यात त्यावर स्पष्टीकरण देण्याचेही आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
कावरे गावातील लोक आंदोलन करीत असताना त्यांच्या हक्काचे उल्लंघन करून त्यांच्यावर खास करून पोलिस खात्याने अत्याचार केल्याची तक्रार सावियो रॉड्रिगीस यांनी मानवी हक्क आयोगाकडे केली होती. दि. २३ एप्रिल रोजी कावरे गावातील सुमारे शंभर गिरीवासी लोकांनी खाणीच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. या आंदोलनकर्त्यांचा नेता नीलेश गावकर यालाही मारहाण करण्यात आली होती.
कावरे गावात पाच खाणी आहेत. यातील काही खाणी बेकायदा असल्याने येथील लोकांनी पणजी येथे खाण संचालनालयासमोर धरणे धरून त्यातील बेकायदा खाण बंद केली होती. या खाणीमुळे गावातील ९० टक्के शेतीवर परिणाम झाला असल्याने त्या खाणीवरून खनिज वाहतूक करण्यासही बंद घातली होती. परंतु, बंदीवरूनही सदर खाणीवरून वाहतूक सुरूच असल्याने लोकांनी ही वाहतूक अडवून ठेवली. यावेळी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करायचे सोडून पोलिसांनी खनिज वाहतूक रोखलेल्या लोकांवर लाठीमार केला, असा दावा तक्रारदार श्री. रॉड्रिगीस यांनी मानवी हक्क आयोगासमोर केला. या लाठीहल्ल्यात महिलांनाही सोडण्यात आले नाही. त्याचे छायाचित्रीकरण मानवी हक्क आयोगाला सादर करण्यात आले आहे.

No comments: