Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 29 May 2011

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांत आजपासून गदारोळ...

मातृभाषाविरोधी मंत्री आणि आमदारांनाही घेराव घालणार

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)
राज्य सरकारच्या माध्यम निर्णयाविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला उद्या रविवारपासून आक्रमक वळण लाभणार असून मुख्यमंत्री, मंत्री तथा मातृभाषाविरोधी आमदार ज्या ज्या कार्यक्रमांना जातील तिथे त्यांना घेराव घालण्याचा निर्णय आज झालेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या बैठकीत घेण्यात आला. मातृभाषांवर घाला घालून गोमंतकीय संस्कृतीच नामशेष करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून जनतेत किती रोष पसरला आहे याचे प्रत्यंतर याद्वारे आणून दिले जाणार आहे.
उद्या २९ रोजी कला अकादमीत ‘युवा सृजन पुरस्कार’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित होणार आहेत. यावेळी भाषाप्रेमींच्या या घेराव आंदोलनाची प्रचिती आणून दिली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, लेखक भिकू पै आंगले, अरविंद भाटीकर, सुभाष वेलिंगकर व उदय भेंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दि. ६ रोजी मातृभाषाप्रेमींनी पुकारलेला ‘गोवा बंद’ यशस्वी करण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीला उपस्थित विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मोलाच्या सूचना केल्या. कदंब महामंडळाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना भेटून ६ रोजी कदंब सेवा बंद ठेवण्यात यावी, अशी विनंती करण्याची सूचना यावेळी विष्णू वाघ यांनी केली. शिवसेनेचे रमेश नाईक यांनी बंद यशस्वी करण्यासाठी आक्रमक धोरण आखण्याची गरज व्यक्त केली.

सर्व पुरस्कार परत करणार ः वाघ
दरम्यान, राज्य सरकारने अघोरी निर्णय घेऊन मातृभाषांचा गळा घोटला आहे. त्यामुळे साहित्यसेवेसाठी आपणास मिळालेले सर्व सरकारी पुरस्कार परत करणार असल्याची घोषणाही यावेळी विष्णू सूर्या वाघ यांनी केली. यावेळी उपस्थित रुद्रेश्वर संस्थेचे देवीदास आमोणकर यांनीही आपल्या संस्थेला व आपणास मिळालेले सरकारी पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले.
उद्यापासून विविध ठिकाणी बैठका घेण्याबरोबरच घेराव कार्यक्रम सुरू ठेवणे, विविध आस्थापने, वाहनमालक, बसमालक यांना दि. ६ रोजी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणे आदी ठराव यावेळी घेण्यात आले.

No comments: