Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 31 May, 2011

नगरनियोजन मुख्यालयावर पारंपाईवासीयांचा भव्य मोर्चा

‘मरीन इंडस्ट्रीज पार्क’ रद्द करण्याची मागणी
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): ‘प्रादेशिक आराखडा २०२१’ समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री दिगंबर कामत व त्यांच्या नेतृत्वाखालील समितीने पारंपाई मडकई येथील लोकांना न कळवता ‘कातोर’ येथील शेतजमिनीवर जो ‘मरीन इंडस्ट्री पार्क’ प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे त्याला समस्त पारंपाई करंजोळ मडकई परिसरातील लोकांचा ठाम विरोध आहे. ‘या प्रकल्पाला मान्यता देणार्‍या मुख्यमंत्र्यांना त्वरित लोकांसमोर स्पष्टीकरण देण्यासाठी बोलवा न पेक्षा खुर्ची खाली करा’, असा जोरदार हल्लाबोल करत मोर्चेकर्‍यांनी आज नगरनियोन कार्यालयावर धडक मोर्चा आणला. ज्येष्ठ नगरनियोजक एस. टी. पुथ्थूराजू व जेम्स मॅथ्यू यांना मोर्चेकर्‍यांनी तीन तास घेराव घातला. अखेर, मुख्यमंत्री गोव्यात नाहीत, आपणास जे शक्य आहे ते आपण करतो असे सांगून व पोलिसांचा ताफा बोलावून वरील दोन्ही अधिकार्‍यांनी या आंदोलकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.
पारंपाई कंरजाळ मडकई येथील मांडवी नदीलगत असलेल्या शेत जमिनीत २ लाख ४५ हजार चौ. मी. जागेत स्थानिक लोकांना अंधारात ठेवून प्रादेशिक आराखड्याच्या आधारे ‘मरीन इंडस्ट्रीज पार्क’उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १५ मीटर रुंद रस्ता (ज्यामुळे अनेक घरांना धोका आहे )े बांधण्यास सुरुवात झाली आहे. याचा सुगावा लागताच आज तेथील सुमारे ८०० लोकांनी स्थानिक पंच राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पणजीतील नगरनियोेजन मुख्यालयावर धडक दिली. त्यांनी नगरनियोजकांना घेराव घालून प्रश्‍नांची सरबत्ती केली. स्थानिकांना अंधारात ठेवून, पंचायतीची मान्यता न घेता, शेती व घरे नष्ट करणार्‍या या प्रकल्पाला मंजुरी कुणी आणि कशी दिली, असे विविधप्रश्‍न करून उपस्थितांनी पुथ्थूराजू व मॅथ्यू यांना भंडावून सोडले.
आराखडा समितीचे प्रमुख मुख्यमंत्री कामत यांना येथे बोलवा न पेक्षा खुर्ची सोडा! असा आग्रह मोर्चेकर्‍यांनी धरला. आंदोलकांच्या रेट्यापुढे हे दोन्ही अधिकारी पुरते हतबल झाले. अखेर, मुख्यमंत्री गोव्यात नाहीत, आपल्याला शक्य आहे ते आपण करू, आंदोलकांचे म्हणणे तथा निवेदन वरिष्ठापर्यंत पोचवू असे सांगून त्यांनी आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक ठाम असल्याचे दिसून येताच त्यांच्याच एका सहकार्‍याने पोलिसांना पाचारण केले. मग सुमारे शंभर पोलिस घटनास्थळी आले. निरीक्षक रमेश गावकर यांनी आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर आंदोलक पर्वरी येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास रवाना झाले.
सात दिवसाची मुदत
या आंदोलकांचे नेते पंच राजेश नाईक यांनी ‘दहाजण समाज’ कंरजाळ मडकईतर्फे हे आंदोलन उभारण्यात आले असल्याचे सांगितले. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्या मुदतीत सदर प्रकल्प रद्द न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चेकर्‍यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकाराचा निषेध करणार असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले.
----------------------------------------------------------------
इंग्रजी नको स्थानिक भाषेत बोला
नगरनियेजन खात्यातील नगरनियोजक एस. टी. पुथ्थूराजू व मॅथ्यू हे आंदोलकांना इंग्रजीत समजावत होते. यावेळी उपस्थितांनी इंग्रजीत नको कोकणी, हिंदी न पेक्षा मराठीत बोला असे खडसावले. मात्र वरील अधिकारी बिगरगोमंतकीय असल्याने त्यांनी मोडक्या तोडक्या हिंदीत लोकांची समजूत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. इंग्रजीच्या समर्थकांना ही सणसणीत चपराकच म्हटली पाहिजे.

No comments: