चौथ्या मराठी चित्रपट महोत्सवाचे थाटात उद्घाटन
पणजी, दि .३ (प्रतिनिधी): मातृभाषेला दुय्यम लेखणे हे महापाप असून गोव्यातील स्थानिक भाषांच्या प्रगतीसाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांनी आज (दि.३) येथे बोलताना केले. कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात आयोजित केलेल्या चौथ्या गोमंतकीय मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर श्री. गोखले बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंह राणे, प्रमुख प्रायोजक वामन हरी पेठेचे संचालक आदित्य पेठे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तळवलकर, तेजस्विनी पंडित, कोेमलीनी मुखर्जी, अभिनेते सचिन खेडेकर, अशोक समर्थ, उदय टीकेकर, गिरिजा ओक, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, नितीन देसाई, सचिन कुंडलकर, रवींद्र जाधव, पुष्कर श्रोत्री, राजेश पिंजानी, किरण यज्ञोपवीत, आयोजक विन्सन ग्राफिक वास्कोचे संजय शेट्ये, अन्य निर्माते व कलाकार नील सखेनकर, अरविंद जगताप, मनोज जोशी, उमेश कुलकर्णी, गिरीश वानखेडे, शरद शेलार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. गोखले यांनी प्रथम कोकणीतून लिहून आणलेल्या भाषणाने बोलण्यास प्रारंभ केला. त्यानंतर ते मराठीत बोलले. ते पुढे म्हणाले की मातृभाषेला सर्वोच्च स्थान हवे. आपण स्वतः मराठीत शिकलो असून चांगल्यापैकी इंग्रजी बोलू शकतो. त्यामुळे जागतिक भाषा असलेल्या इंग्रजीला जास्त महत्त्व नको मात्र ती भाषा अवश्य शिका. असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक आशयप्रधान उत्कृष्ट मराठी चित्रपट कोकणीत डबिंग करण्यासाठी व कोकणी चित्रपट महोत्सव महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असेही प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री कामत यांनी गोवा हे कायम स्वरूपी महोत्सवी राज्य व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे सांगून मराठी चित्रपट महोत्सव दरवर्षी आयोजित करणार असल्याचे प्रतिपादन केले. सभापती राणे यांनी आयोजक विन्सन ग्राफिक वास्कोे यांचे नेटक्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले.
कलाकारांच्या वतीने बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली की कलाकाराला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयाची गरज असून जगातील प्रत्येक माणसाने आपला चित्रपट पाहावा असे कलाकाराला नेहमी वाटते.
सुरुवातीला श्री सातेरी केळबाय रणमाले मंडळ झरमे सत्तरी यांचा ‘रणमाले’ सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. या दरम्यान देवा मालवणकर व राजेश पेडणेकर यांचे रणमाले लोककला जपणुकीवर उत्कृष्ट नाट्य झाले. तसेच देवा मालवणकर, सोनिया सिरसाट व अपर्णा शिंदे यांचे गायन झाले. सूत्रनिवेदन संगीता अभ्यंकर व सौ. जोशी यांनी केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘बालगंधर्व’ हा चित्रपट दाखवण्यात आला.
---------------------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांना शालजोडीचे धक्के
उद्घाटक विक्रम गोखले यांनी इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. आपण मराठीत शिकूनसुद्धा इंग्रजी चांगले बोलतो. तेव्हा मातृभाषेला दुय्यम स्थान देण्याचे पाप करू नका असे विधान करून इंग्रजी माध्यम लागू करणार्या मुख्यमंत्र्यांना चांगलेच शालजोडीतले शाब्दिक फटके लगावले. विक्रम गोखलेच्या या विधानानंतर बराच वेळ प्रेक्षकांच्या टाळ्या चालू होत्या. काहीजण शेम! शेम! म्हणत होते. तर मुख्यमंत्री सुन्न झाले होते. या पूर्वी सुरुवातीच्या कार्यक्रमात गुरु झालेल्या राजेश पेडणेकर यांनी देवा मालवणकर यांना सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे सादर होणारे ‘रणमाले’ हा कलाप्रकार पुढे टिकेल का? ते इंग्रजीतून सादर करण्याची पाळी पुढील काळात येणार नाही ना? असे प्रश्न विचारून मुख्यमंत्र्याना चांगलेच खिजवले. यावेळीसुद्धा प्रेक्षकातून शेम! शेम! च्या घोषणा आल्या.
कामत यांचा धिक्कार
दरम्यान ‘अंत्रूजचे घुडयो’ या युवकांच्या पथकाने या सोहळ्यादरम्यान माध्यम प्रश्नावरून पथनाट्य सादर केले व कोकणी मराठीचा जयजयकार करत मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या वेळी व जातेवेळी ‘दिगंबर कामत गेट वेल सून’ व इतर निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
Saturday, 4 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment