Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 2 June, 2011

रामदेवबाबा प्रकरणी केंद्राची शिष्टाई फसली

-काळा पैसा, भ्रष्टाचारावर उपोषण करणारच
-१ कोटी लोक सहभागी होण्याचा दावा

नवी दिल्ली, दि. १
काळा पैसा, भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून येत्या शनिवारपासून योगगुरू बाबा रामदेव हे बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याने चिंताग्रस्त बनलेल्या केंद्र सरकारने त्यांची समजूत काढण्याच्या दिशेने आज तातडीची पावले उचलताना त्यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासह चार ज्येष्ठ मंत्र्यांनी बाबा रामदेव यांना सरकारची भूमिक पटवून देण्याचा प्रयत्न केला. ४ जूनपासून बेमुदत उपोषणाचे शस्त्र उपसू नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. मात्र, त्यांची ही विनंती धुडकावून लावत बाबा रामदेव यांनी उपोषणाला बसण्याच्या निर्धारावर ठाम असल्याचे सांगितले. ‘दिल्लीतील रामलीला मैदानावर शनिवारी बेमुदत उपोषणाला मी प्रारंभ करणार आहे. मी मागे हटणार नाही. देशभरातील ६२४ जिल्ह्यांमधील जवळपास १ कोटी लोक उपोषणाला बसून या मुद्याला पाठिंबा देतील,’ असा दावा बाबा रामदेव यांनी केला.
बाबा रामदेव मध्यप्रदेशातील उज्जैन येथून दिल्लीला चार्टर्ड विमानाने आज पोहोचलेत. मात्र, त्यांच्या पोहोचण्यापूर्वीच अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल व केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय हे विमानतळावर पोहोचले होते. बाबा रामदेव येण्यापूर्वीच त्यांना गाठून त्यांची समजूत काढण्यासाठीच या सर्व मंत्र्यांचा लवाजमा विमानतळावर पोहोचला होता. या सर्वांनी बाबा रामदेव यांच्याशी विमानतळावरच चर्चा केली व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘उपोषणावर आपण ठाम आहे. उपोषणावरून मागे हटणार नाही,’ असे बाबा रामदेव यांनी सांगितल्याने सरकारच्या प्रयत्नांवर पाणी ङ्गेरल्या गेले. ‘भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सरकारने निर्णायक कारवाई करायलाच हवी,’ अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, बाबा रामदेव यांची समजूत काढण्यासाठी तब्बल चार ज्येष्ठ मंत्र्यांना पाठविण्याच्या निर्णयाचे राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात असून, यावरून सरकार किती धास्तावले आहे, हेच दिसून येते, अशीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, येत्या ३ जून रोजीही रामदेव बाबांची भेट घेऊन सरकारचे प्रतिनिधी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी पत्रकारांना सांगितले.
‘‘बाबा रामदेव यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी आमच्या समोर मांडलेले मुद्दे देशहिताचे आहेत. त्यांचे मुद्दे गंभीर आहेत. येत्या काही दिवसांत त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली जाईल,’’ असे चर्चेनंतर कपील सिब्बल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बाबा रामदेव यांच्या उपोषणावर मात्र त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
लोकपाल विधेयकावर बाबा रामदेव यांनी मंगळवारी अण्णा हजारे यांच्या विसंगत भूमिका घेताना या विधेयकाच्या चौकटीत पंतप्रधान आणि सरन्यायाधीश नकोत, असे म्हटले होते.

No comments: