Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 4 June 2011

मुख्याध्यापक संघटना राजी

‘आठवी उत्तीर्ण’ निर्णय मान्य
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर आज मुख्याध्यापक संघटनेने आठवीपर्यंत मुलांना ‘उत्तीर्ण’ करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. गेल्या काही दिवसापासून सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध करणारी मुख्याध्यापक संघटना नेमकी कोणत्या मुद्यावर राजी झाली हे कळू शकले नाही. मात्र, कशा पद्धतीने मुलांना आठवीपर्यंत ‘उत्तीर्ण’ करता येईल याची मार्गदर्शनतत्त्वे येत्या काही दिवसांत सर्व विद्यालयांना देणार असल्याचे शिक्षण खात्याच्या संचालिका डॉ. सेल्सा पिंटो यांनी सांगितले. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या दोन दिवसांआधीच मुलांना आठवीपर्यंत ठेवण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याने आता अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्याध्यापक संघटनेने ठेवलेले सर्व मुद्दे आम्हांला मान्य झाले आहेत. येत्या दोन दिवसांत मार्गदर्शनतत्त्वेही देणार असल्याचे आश्‍वासन सरकारने दिले आहे, असे संघटनेचे प्रवक्ते जोस क्वाद्रोज यांनी सांगितले. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या आधारावर उत्तीर्ण करता येईल याचीच कोणतीही मार्गदर्शनतत्त्वे विद्यालयांना दिली नसल्याने मुख्याध्यापक संघटनेने सरकारच्या या परिपत्रकाला विरोध केला होता.
तसेच, हे नवीन परिपत्रक काढण्यापूर्वी मुलांना पास करण्याची जुने परिपत्रकही रद्द करण्यात आले नव्हते. येत्या तीन दिवसांत अनुत्तीर्ण झालेल्या सर्व मुलांच्या गुणपत्रिकेत बदल केला जाणार असल्याचेही श्री. क्वाद्रोज यांनी सांगितले. ही मार्गदर्शनतत्त्वे ठरवण्यासाठी येत्या दि. ७ जून रोजी शिक्षण संचालिका आणि मुख्याध्यापक संघटनेची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

No comments: