Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 31 May 2011

पोलिसांनीच बाळ्ळीकरांना ‘उटा’ विरोधात चिथावले?

पोलिस गुप्तचर यंत्रणा अपयशी
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): बाळ्ळी येथील ‘उटा’ आंदोलनाबाबत पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी उधळलेली मुक्ताफळे आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारीच ठरली आहेत. मुळात ‘उटा’ चे आंदोलन चिघळणार याची पूर्वकल्पना पोलिसांना अजिबात नव्हती, हा आत्माराम देशपांडे यांचा दावा पोलिस गुप्तचर यंत्रणेचे धिंडवडे काढणारा ठरला आहे. ‘उटा’ आंदोलकांसमोर निष्प्रभ ठरलेल्या पोलिसांनीच आपल्या बचावार्थ स्थानिकांना पुढे करून या आंदोलनाच्या आगीत तेल ओतले व त्याचा भडका उडाल्यानेच दोघा आदिवासी युवकांचा बळी गेला, अशी माहिती आता समोर येऊ लागली आहे.
‘उटा’ संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला १५ मे रोजीची मुदत दिली होती. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी नेहमीप्रमाणेच याकडे कानाडोळा केल्याने ‘उटा’ तर्फे पत्रकार परिषद आयोजित करून २५ मे नंतर उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. राज्यात गुर्जरांच्या धर्तीवर सशस्त्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही संघटनेतर्फे सांगण्यात आले. या घटनेनंतर आठ दिवस विविध आदिवासी प्रभावीत क्षेत्रात संघटनेकडून जागृती बैठकांचे आयोजन करून २५ रोजीच्या आंदोलनाची जय्यत तयारीही सुरू करण्यात आली होती. एवढे काही घडत असताना पोलिस गुप्तचर यंत्रणा नेमकी बेफिकीर कशी काय राहिली, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.
पोलिसांच्या सामूहिक रजेचे गुपित काय?
२५ मे नंतर ‘उटा’तर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असताना याच काळात दक्षिण गोव्यातील बहुतांश वरिष्ठ पोलिस अधिकारी सामूहिक रजेवर जाण्याच्या प्रकारावरूनही आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘उटा’ संघटनेतर्फे सुरू असलेल्या जय्यत तयारीवरून हे आंदोलन निश्‍चितच तीव्र होणार याचे स्पष्ट संकेत असताना दक्षिण गोव्याचे अधीक्षक ऍलन डिसा, उपअधीक्षक उमेश गांवकर, मडगावचे निरीक्षक संतोष देसाई व कुंकळ्ळीचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर आदी सर्व अधिकारी एकाचवेळी रजेवर कसे काय जातात, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. ऍलन डिसा यांच्या अनुपस्थितीत अधीक्षकपदाचा ताबा टोनी फर्नांडिस यांच्याकडे सोपवण्यात आला.
टोनी कुंकळ्ळीचे संभावित उमेदवार!
अधीक्षक टोनी फर्नांडिस हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. टोनी हे कुंकळ्ळीचे सुपुत्र आहेत व बाळ्ळी येथील स्थानिकांशी त्यांचा चांगला परिचय आहे. विशेष म्हणजे निवृत्तीनंतर सक्रिय राजकारणात उतरण्याचा त्यांचा मनोदय आहे व व त्यात कुंकळ्ळीतून त्यांना उमेदवारी देण्याची घोषणा दक्षिण गोव्यातील एका नेत्याने काही दिवसांपूर्वी केली होती. या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर टोनी यांनी जनतेच्या गाठीभेटी सुरू केल्याचीही माहिती मिळाली आहे. ‘उटा’ चे आंदोलन बाळ्ळी येथे झाल्याने आपण ते सहजपणे हाताळू अशा अविभार्वात टोनी वागल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी लाठीहल्ल्याचा आदेश दिला, त्यावेळी मुळातच पोलिस कुमक कमी होती व त्यामुळे आंदोलकांसमोर पोलिसांचे काहीही शहाणपण चालले नाही. या परिस्थितीचा फटका म्हणूनच टोनी फर्नांडिससह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी जखमी झाले. टोनी फर्नांडिस यांनाही आंदोलकांनी मारहाण केली, अशी खबर त्यांचे समर्थक असलेल्या स्थानिकांत पोहचताच ते खवळले व त्यांनी एकत्रित होऊन आंदोलकांवर हल्लोबोल करण्यास सुरुवात केली असे सांगितले जाते. ‘उटा’ आंदोलकांविरोधात स्थानिकांनी केलेल्या या उठावाला खुद्द पोलिसांकडूनच फुस मिळाल्याचा संदेश पसरताच त्याला अधिकाधिक पाठिंबा मिळत गेला.
आपल्या कृतीला पोलिसांचा पूर्ण पाठिंबा लाभत असल्याचा समज दृढ होत गेल्यानेच स्थानिकांनी ‘उटा’ च्या नेत्यांना लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली. या भावनेतूनच आदर्श सोसायटी व आंचल इमारतीला आग लावण्याचा प्रकार घडला व त्याचे पर्यवसान म्हणून दोन आदिवासी युवकांचा बळी गेला. पोलिसांच्या डोळ्यांदेखत ‘उटा’ समर्थकांना स्थानिकांकडून मारहाण केली गेली व पोलिसांनी त्यांना रोखण्याचे सोडून त्यांच्या या कृतीचे समर्थन केले व त्यामुळेच चुकीचा समज पसरल्यानेच ही परिस्थिती हाताबाहेर गेली, अशी माहिती उघड झाली आहे.
बाळ्ळी येथील या घटनेत पोलिसांचा हात असण्याची शक्यता आत्माराम देशपांडे यांनी फेटाळून लावली असली, तरी आता नव्याने प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार पोलिसांनीच आपल्या बचावार्थ स्थानिकांना पुढे करून ‘उटा’ आंदोलकांवर हल्ला करण्यास प्रेरित केले व त्यांना कायदा हातात घेण्यास रान मोकळे करून दिले, अशीही खबर मिळाली आहे.

No comments: