Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 29 May 2011

जळीतकांडाला ‘उटा’च जबाबदार!

पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडेंची मुक्ताफळे

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)
बाळ्ळी येथे २५ रोजी झालेल्या भीषण जाळपोळीचे संपूर्ण खापर गोवा पोलिसांनी ‘उटा’वरच फोडले आहे. ‘उटा’ संघटनेतर्फे सरकार दरबारी सादर केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या व त्यामुळे त्यांचे आंदोलन हिंसक बनण्याची सुतराम शक्यता पोलिसांना दिसली नव्हती. मात्र, आंदोलकांवर ताबा मिळवण्यात नेत्यांना अपयश आले व त्यामुळेच पुढचे सर्व प्रकरण घडले, अशी भूमिका आज पोलिस विशेष विभागाचे अधीक्षक तथा प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांनी पोलिस मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
‘उटा’चे बहुतांश आंदोलक हे मद्यधुंद अवस्थेत होते. बाळ्ळीतील स्थानिक लोक व आंदोलकांत धुमश्‍चक्री सुरू झाली त्यावेळी पोलिस घटनास्थळी हजर नव्हते व त्यामुळे पोलिसांच्या डोळ्यांदेखत जळीतकांड झाले या आरोपांत काहीही तथ्य नाही, असेही ते म्हणाले. सुमारे दीड तास संपूर्ण घटनाक्रमाचे धावते समालोचन सादर करून बाळ्ळीत उद्भवलेल्या परिस्थितीला आंदोलकच जबाबदार असल्याचा सूर त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला.
आदर्श सोसायटीला लावण्यात आलेल्या आगीत दोघा युवकांचा मृत्यू झाला. यांपैकी दिलीप वेळीप याच्याजवळ वाहनचालक परवाना व ओळखपत्र सापडल्याने त्याची ओळख पटली आहे. परंतु, दुसर्‍या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याचे सांगून त्याच्या कुटुंबीयांनी व ‘उटा’च्या नेत्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बाळ्ळीत उद्भवलेल्या परिस्थितीत लाठीमाराचा आदेश देण्याचा निर्णय अनपेक्षित होता, असे सांगतानाच त्यावेळी वरिष्ठ पोलिस जखमी झाल्याने पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणीच हजर नव्हता व त्यामुळेच जिल्हाधिकार्‍यांना लाठीमाराचा आदेश देणे भाग पडले, असे लंगडे समर्थनही श्री. देशपांडे यांनी केले. ‘उटा’च्या नेत्यांबरोबर आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस व वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक झाली तेव्हा त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात आला होता. फक्त हा संदेश आंदोलकांना देऊन त्यांना घटनास्थळावरून हटवण्याचे तेवढे बाकी राहिले होते. परंतु, आंदोलकांवर नेत्यांचे कोणतेच नियंत्रण राहिले नाही व त्यांनी बेफाम दगडफेक सुरू केल्यानेच वातावरण चिघळले, असेही स्पष्टीकरण श्री. देशपांडे यांनी पुढे केले आहे.
‘उटा’चे आंदोलन हिंसक वळण प्राप्त करणार अशी कोणतीही माहिती पोलिस गुप्तहेर यंत्रणांकडून मिळाली नाही. तथापि, ज्या अर्थी आंदोलकांनी हातात दंडुके व रस्त्यावर झाडे आडवी घातली त्यावरून हिंसेचा मार्ग स्वीकारण्याचा त्यांचा पूर्वनियोजित कट होता, अशी परस्परविरोधी विधानेही श्री. देशपांडे यांनी केली. ‘उटा’तर्फे आपल्या मागण्यांप्रीत्यर्थ होणारे आंदोलन गुर्जर आंदोलनाच्या धर्तीवर होणार असे संकेत यापूर्वीच दिले होते व असे असूनही या आंदोलनाबाबत पोलिस यंत्रणा बेफिकीर कशी राहिली, असा सवाल पत्रकारांनी केला असता, २४ रोजी ‘उटा’ तर्फे दिलेल्या निवेदनात ते बाळ्ळी येथे जागृती सभा बोलावणार असल्याचे सांगण्यात आले होते. या जागृती सभेत केवळ ‘उटा’चे नेते आंदोलकांना आपल्या न्याय्य हक्कांबाबत मार्गदर्शन करणार व नंतर आंदोलन आटोपते घेणार, असा पोलिसांना होरा होता, अशी मल्लिनाथी श्री.देशपांडे यांनी केली.
बाळ्ळीतील स्थानिकांकडून ‘उटा’ आंदोलकांना मारहाण करण्याच्या प्रकाराचा मात्र त्यांनी अजिबात उल्लेख केला नसल्याने पत्रकारांनी त्यांना याविषयी छेडले. त्यावेळी पोलिसांचा ताफा विखुरला गेला होता व नव्याने जमवाजमव करण्यासाठी कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर पोलिस जमले होते, अशी सबबही श्री. देशपांडे यांनी पुढे केली. याप्रकरणी एकूण सहा गुन्हे नोंद करण्यात आले असून ‘उटा’च्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्याच्या घटनेचाही समावेश आहे; रमेश तवडकरांच्या तक्रारीवरून कुंकळ्ळी पोलिस स्थानकात ‘एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, स्थानिक वृत्तवाहिन्यांवर स्थानिक लोकांकडून पोलिसांच्या समक्ष आंदोलकांना मारहाण करण्याची क्षणचित्रे प्रसिद्ध झाली आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे का नोंद केले नाहीत, असा सवाल केला असता या क्षणचित्रांचा आढावा घेणे सुरू असल्याचे श्री. देशपांडे म्हणाले.

‘उटा’तर्फे पूल उडवण्याचा कट
२५ रोजी ‘उटा’च्या हिंसक आंदोलनाची परिणती म्हणून येथील काही पूल उडवून देण्याची तयारी त्यांनी चालवल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती व त्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून स्फोटके वापरण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली होती. या माहितीमुळेच तात्काळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तुकडीला तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या आंदोलनावेळी खुद्द आमदार रमेश तवडकर यांना झालेल्या मारहाणीची दखल पोलिसांनी कशी काय घेतली नाही, असे विचारताच त्याची दखल घेतल्याचे ते म्हणाले. आदर्श सोसायटी व आंचल इमारतीला आग लावण्याच्या प्रक्रियेत पोलिसांच्या सहभागाचा आरोप फेटाळून लावताना आंदोलकांच्या दगडफेकीचा सामना करूनही पोलिसांनी परिस्थिती शांतपणे हाताळली, असा शेराही त्यांनी मारला.

No comments: