Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 June, 2011

महिलांना बाहेर काढून मारहाण

अद्याप कोणालाही अटक नाही
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): आदर्श सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेल्या घरात आश्रय घेऊन थांबलेल्या महिलांना बाहेर काढून गुंडाबरोबरच पोलिसांनीही मारहाण केली, अशी धक्कादायक माहिती ‘सीआयडी’ने घेतलेल्या जबानीत उघडकीस आली आहे. मात्र, चौकशीच्या सहाव्या दिवशीही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. खुनाच्या प्रकारात तिघांवर गुन्हे नोंद केले आहेत. मात्र कोणालाही अटक केल्यास पुन्हा ‘राडा’ करु असा इशारा दिल्याने पोलिसही सावध झाले आहेत. त्यामुळे सध्या केवळ जबान्याच नोंदवून घेतल्या जात आहेत.
रमेश तवडकर यांच्या पत्नीलाही त्याच घरातून बाहेर काढून पोेलिसांनी लाठ्यांनी मारहाण केली. आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी जेवण बनवण्यासाठी त्या घरात काही महिलांना आणून ठेवले होते. त्या महिला तेथे असल्याची माहिती पोलिसांना आणि हल्ला करण्यासाठी आलेल्या त्या गुंडांच्या टोळीला असल्याने त्या ठिकाणी हल्ला चढवण्यात आला. यावेळी महेश कोनेकर या पत्रकाराने त्याठिकाणी धाव घेत तवडकर यांच्या पत्नीला रेल्वेस्थानकावरुन बाळ्ळी आरोग्य केंद्राजवळ नेऊन सुखरूप सोडले. ही घटना सुमारे ५.४५ वाजता घडली.
सुमारे ५.३० वाजता आमदार तवडकर यांच्यावर गुंडांच्या टोळीने हल्ला चढवला. तेव्हा येथे असलेल्या काणकोण नगरपालिकचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी त्यांना मिठी मारुन हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पत्रकार प्रशांत नाईक व महेश कोनेकर यांनीही त्यांना या गुंडाच्या तावडीतून सोडवून घेतले.
पोलिस हा प्रकार पाहत होते आणि गुंड आंदोलनकर्त्यांना झोडत होते, असेच चित्र त्याठिकाणी बनले होते. आदर्श सोसायटीला आग लावण्यात आली तेव्हा त्याठिकाणी पोलिस उपस्थित होते. त्याच्या बाजूलाच असलेल्या त्या घरात घुसून महिलांना बाहेर काढून मारहाण करण्यात येत होती, अशीही माहिती पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आली आहे.
मंगेशचे एसएमएस
सुमारे ६.१५ वाजता मंगेश गावकर आचल इमारतीतून बाहेर गेला होता. आपण सुखरुप असून बाळ्ळीच्या चौकात येत असल्याची त्याने एकाला दूरध्वनीवरुन माहिती दिली होती. मग, मंगेशचा मृतदेह आचलमधे कसा सापडला याचेकोडे अद्याप गुलदस्त्यात आहे. काही मिनिटातच ‘आयम इन ट्रबल’ असा ‘एसएमएस’ही त्याने पाठवला. ६.३० ते ६.४५ या दरम्यान आचलला आग लावण्यात आली. त्यामुळे पळत जात असताना मंगेशला पकडून पुन्हा आचलमध्ये आणून टाकल्याच्या आरोपांना पुष्टी मिळत आहे.
न्यायालयीन चौकशीचा आदेश
बाळ्ळी येथे झालेल्या जळीतकांड आणि एकूण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारने आज काढला. या विषयीचे एक पत्र मुंबई उच्च न्यायालयाला पाठवण्यात आले असून त्यानंतर चौकशीसाठी न्यायालयाची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश देऊन हिंसेला कारणीभूत ठरलेल्या दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना निलंबित करण्याचा आदेशही काल सरकारने काढला होता.

No comments: