भाजपचा पणजीत प्रमुख कार्यकर्ता मेळावा
पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
भारतीय भाषा सुरक्षा मंचाने येत्या ६ जून रोजी दिलेल्या ‘गोवा बंद’च्या हाकेला पाठिंबा देत संपूर्ण शक्तिनिशी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचे आज पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जाहीर केले. आज (दि.१) सायंकाळी पणजी येथील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत याविषयीची घोषणा केली. त्याचप्रमाणे, शिक्षणाच्या धोरणात बदल केला जाणार नसल्याचे सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी व बाळ्ळी येथे घडलेल्या संपूर्ण घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी, या विषयीचे ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष प्रा. पार्सेकर यांच्यासमवेत उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक व भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते. दि. २५ मे हा भाजपने काळा दिवस म्हणून साजरा केला आहे. या दिवशी राज्य सरकारने इंग्रजीला अनुदान देण्याची घोषणा करून गोव्याचा घात केला आहे. तर, दुसर्या बाजूने बाळ्ळी येेथे सुरू असलेल्या ‘उटा’ आंदोलनाला दोन तरुणांना जिवंत जाळून त्यांची हत्या करण्यात आली. ‘उटा’ संघटनेच्या मागण्या रास्त होत्या. त्यांची पूर्तता सरकारने केली पाहिजे. तसेच, या जळीतकांडाची न्यायाधीशांमार्फतच चौकशी केली जावी, असा ठराव घेण्यात आल्याची माहिती श्री. पार्सेकर यांनी दिली.
माध्यम विषयीचा ठराव विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी मांडला. तर, त्याला आमदार फ्रान्सिस डिसोझा, माजी सभापती ऍड. विश्वास सतरकर, डॉ. विल्फ्रेड डिसोझा व आमदार महादेव नाईक यांनी अनुमोदन दिले. गेली चार वर्षे ही गोमंतकीयांच्या जीवनातील अत्यंत दुर्दैवी आहेत. या सरकारने केवळ तुफान घोषणा केल्या. कृती मात्र शून्य. या चार वर्षात बेकायदा खाण व्यवसाय केला. महागाईने लोकांना होरपळून काढले, अशी टीका श्री. पार्सेकर यांनी केली.
बाळ्ळी येथे हत्या करण्यात झालेल्या ‘त्या’ दोघा तरुणांच्या घरी अद्याप या राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत किंवा अन्य कोणत्याही मंत्र्याने भेट दिलेली नाही. त्यामुळे हे सरकार अनुसूचित जमातीच्या लोकांकडे कोणत्या दृष्टीने पाहते हे स्पष्ट होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
८ जून ‘निषेध दिन’ पाळणार
येत्या ८ जून रोजी निष्क्रिय कॉंग्रेस सरकार चार वर्षे पूर्ण करीत असून त्या दिवशी निषेध दिवस म्हणून भारतीय जनता पक्ष संपूर्ण राज्यात पाळणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. यावेळी प्रत्येक मतदारसंघात सरकारच्या प्रतिमेचे दहन, सभा अशा प्रकारचे कार्यक्रम केले जाणार आहेत.
Thursday, 2 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment