Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 1 June 2011

बाळ्ळीतील हिंसक घटनांमागे सत्ताधारी राजकारण्यांचे हस्तक?

मडगाव, दि. ३१ (प्रतिनिधी): गेल्या बुधवारी बाळ्ळी येथे ‘उटा’ आंदोलकांवर हल्ला करून जाळपोळ करणारे हे दक्षिण गोव्यातील एका बलाढ्य मंत्र्यांचे तसेच एका सत्ताधारी आमदाराचे हस्तक असल्याची उघड चर्चा या परिसरात सुरू आहे. त्याच कारणास्तव राजकीय दडपणामुळे पोलिस त्यांना हात लावू शकलेले नाहीत असा आरोप होत आहे.
सध्या पुढे येत असलेल्या माहितीप्रमाणे याच लोकांनी तेथे त्या दिवशी अफवा पसरल्या. जिल्हाधिकार्‍यांना आंदोलकांनी मारहाण केल्यासारख्या अफवेचाही त्यात समावेश होता व त्यामुळेच स्थानिक लोक खवळले व त्यातून पुढील अनर्थ घडला. एका पोलिस अधिकार्‍याचाही या अफवा पसरवण्यात समावेश आहे. या सर्व प्रकारात हात असलेले हे साधारण ४० ते ४५ गुंड प्रवृत्तीचे असून त्यांचा ‘उटा’शी काहीच संबंध नव्हता. आंदोलन सुरु झाल्यापासून त्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती व ते बाळ्ळी चाररस्ता परिसरात घुटमळत होते.
पोलिस स्थानकावर झालेल्या चर्चेनंतर ‘उटा’ नेते परत आले व त्यांनी रस्ता व रेल्वेमार्गावरील बंद उठविण्याची व मुख्यमंत्री येईपर्यंत बाळ्ळी येथेच धरणे धरण्याची घोषणा केली. तेव्हा काही संतप्त आंदोलक त्याला राजी झाले नाहीत व त्यांनी मुख्यमंत्री येईपर्यंत महामार्ग रोखून धरण्याचा हट्ट धरला. तेव्हा पोलिस लाठीमाराचा आदेश दिला गेला. त्याला प्रत्युत्तर म्हणून तयारीनिशी आलेल्या आंदोलकांनी दगडफेक केली. त्यावेळी पोलिस पळून गेले. त्याच वेळी सकाळपासून गप्प असलेली ती मंडळी सक्रीय झाली व त्यांनी स्थानिकांना आंदोलकांविरुद्ध चिथावणी दिली व त्यानंतरच खरी जाळपोळ सुरु झाली. आदर्श व आंचलला लावलेली आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या बंबाला याच लोकांनी अडवून धरले.त्या सर्वांची नावे दिलेली असली तरीही गुन्हेगारांना अजून जेरबंद केले गेलेले नाही. त्यांंना अटक होणार असे दिसताच राजकारण्यांनी बाळ्ळी येथील लोकांना चिथावणी देऊन बैठक घेण्यास भाग पडले. त्यांनी बैठक घेऊन या तिघांना अटक केल्यास बाळ्ळी येथून संबंधितांचे मृतदेह घेऊन पुढे जाऊ देणार नाही व उटाच्या लोकांना बाळ्ळीहून मडगाव किंवा काणकोणला जाऊ देणार नाही अशी धमकी दिली. या बैठकीस १५०पेक्षा जास्त लोक होते पण त्यात स्थानिकांपेक्षा सदर राजकारण्याच्या कार्यकर्त्यांचाच अधिक समावेश होता. त्यावरुन बाळ्ळी घटनेत राजकारण अधिक असल्याचे दिसून येते.

No comments: