Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 31 May 2011

म्हापशात साकारणार अद्ययावत आंतरराज्य बस टर्मिनस

आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या अथक प्रयत्नांना यश
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): उत्तर गोव्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या म्हापशात लवकरच अद्ययावत आंतरराज्य बस टर्मिनस उभे राहणार आहे. अनोख्या डिझाईनद्वारे साकारल्या जाणार्‍या या टर्मिनसच्या उभारणीसाठी सुमारे २० हजार चौरसमीटर जागा संपादण्यात आली आहे. नजीकच्या काळात या कामाला आरंभ होईल, अशी माहिती वाहतूक खात्यातील सूत्रांनी दिली. स्थानिक आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या अथक प्रयत्नाअंती हा प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे.
म्हापशाची शान या दृष्टिकोनातूच सदर टर्मिनस प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. म्हापसा हे उत्तर गोव्यातील प्रमुख शहर आहे. तेथील सध्याचे बसस्थानक अपुरे पडत असल्याने या बसस्थानकाजवळच असलेली सुमारे २० हजार चौरसमीटर जागा यापूर्वीच वाहतूक खात्याने संपादित केली आहे. तेथेच हे बस टर्मिनस उभारले जाईल. या बसटर्मिनसवर राज्याअंतर्गत बससेवेसह आंतरराज्य बस सेवेसाठी वेगळी जागा निश्‍चित केली जाणार आहे. गोव्याबाहेरील बसगाड्यांसाठी वेगळा मार्ग निश्‍चित केला जाणार आहे. या गाड्यांना शहरांत प्रवेश न करता थेट महामार्गाव्दारे त्यांना सोडण्यात येईल. म्हापशात सध्या मुंबई, पुणे तसेच इतर आंतरराज्य बसगाड्यांसाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे संध्याकाळी तेथे मोठी वाहतूक कोंडी होते. नव्या बस टर्मिनसमुळे ही समस्या कायमची सुटणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बसस्थानकाची जागा पार्किंगसाठी वापरण्याचा सरकारचा विचार असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्याही निकालात निघेल.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणांत म्हापशातील बस टर्मिनस प्रकल्पाला लवकरच सुरुवात केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. वाहतूक खात्याने तात्काळ या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी केली. नवीन बस टर्मिनससह मासळी मार्केट, भाजी मार्केट आदी प्रकल्पांचे काम जोरात सुरू आहे. म्हापशातील श्री देव बोडगेश्‍वर मंदिरासमोर जॉगर्स पार्क उभारण्यासही सरकारने मंजुरी दिल्याने या प्रकल्पाची मुहूर्तमेढ लवकरच घातली जाईल, असेही यावेळी आमदार डिसोझा म्हणाले.
खोर्लीत उभारणार रिंग रोड
म्हापसा खोर्ली येथे निर्माण होणार्‍या वाहतूक कोंडीवर रिंग रोडचा पर्याय शोधण्यात आला आहे. खोर्ली ते पर्रा व थेट गिरी येथे राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार आहे. या रिंग रोड प्रकल्प उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणामार्फत राबवला जाणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाला सुरुवात झाल्याची माहिती आमदार श्री. डिसोझा यांनी दिली. पर्रा ते गिरी या टप्प्यातील भूसंपादन अंतिम टप्प्यात पोहचल्याचेही त्यांनी नमूद केले.

No comments: