Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 2 June 2011

तिलारी प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या द्या

...अन्यथा मुलीसह २० रोजी आत्मदहन
संजय नाईक यांचा इशारा

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
राज्य सरकारने येत्या १० जूनपर्यंत तिलारी प्रकल्प अन्यायग्रस्तांना नोकर्‍या देण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास २० जून रोजी पर्वरी येथील सचिवालयासमोर आपल्या मुलीसह आत्मदहन करण्याचा इशारा समितीचे सचिव संजय नाईक यांनी दिला आहे.
तिलारी प्रकल्पाला जमीन देऊन आम्ही उघड्यावर पडलो आहोत. आम्हांला कोणी वाली राहिलेला नाही. गोवा सरकारने आश्‍वासन देऊनही नोकर्‍या दिलेल्या नाही, अशी टीका श्री. नाईक यांनी केली. त्यामुळे येत्या १० जूनपर्यंत प्रकल्पग्रस्त लोकांना नोकर्‍या देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी गोवा सरकारला अपयश आल्यास २० जूनला आत्मदहन केले जाईल, अशी धमकी श्री. नाईक त्यांनी दिली आहे.
तिलारी प्रकल्पाला ७९० जणांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. यातील अनेक जणांच्या जमिनी या पिकाऊ होत्या. आता पीक नाही आणि जेवायला अन्नही नाही, अशी परिस्थिती अनेकांची झाली आहे. प्रकल्पाला जमिनी दिलेल्या लोकांना सरकारी नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते. त्याची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र आणि गोवा सरकारने संयुक्त बैठक घेऊन आमच्या मागण्यांवर तोडगा काढवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
तिलारी प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाबाबत राष्ट्रपतींनाही पत्र लिहिण्यात आले आहे. परंतु, त्याचे कोणतेही उत्तर आलेले नाही, अशी माहिती त्याने यावेळी दिली. श्री. नाईक यांच्या आत्मदहनाच्या इशार्‍यामुळे आधीच ‘उटा’ आणि भाषेच्या मुद्यावरून अडचणीत आलेल्या सरकारसमोर तिसरे संकट निर्माण झाले आहे.

No comments: