Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 2 June, 2011

दीपकने अडवल्यामुळे मंगेशचा जळून मृत्यू

जामिनास सीबीआयची हरकत

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
मंगेश गावकर याला आदर्श इमारतीतून बाहेर येण्यापासून अडवल्यामुळे त्याचा जळून मृत्यू झाला, असा ठपका गुन्हा अन्वेषण विभागाने दीपक देसाई याच्यावर ठेवला आहे. त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी जोरदार विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे. उद्या दीपक देसाई याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
दीपक देसाई याने केलेल्या जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी सीआयडी विभागाने केलेल्या पत्रात हा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीत दीपक व त्याच्या अन्य काही साथीदारांनी मंगेश याला आग लागलेल्या आदर्श इमारतीतून बाहेर येण्यापासून अडवले, अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आदर्श इमारतीला आग लागल्यानंतर मंगेश सुखरूपपणे बाहेर पडला होता, या माहितीला पुष्टी मिळाली आहे. तसेच, मंगेश याला मारहाण करून आगीत टाकण्यात आले आहे, या उटा संघटनेने केलेल्या आरोपालाही पुष्टी मिळत आहे. मात्र, मंगेश याला केवळ अडवण्यात आले होते की त्याची हत्या करून त्यानंतर त्याला जळत्या आगीवर टाकण्यात आले, याचा शोध लागणे महत्त्वाचे बनले आहे. मंगेश हा जळत्या काजू बियांच्या आगीवर निस्तेज पडलेला होता. आगीत जळणारी व्यक्ती आगीवरच राहील हे शक्य नाही, असा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. त्यामुळे मंगेश याची हत्या करून त्यानंतर त्याला आगीत टाकण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनीही व्यक्त केला आहे.
सध्या पोलिसांना उपलब्ध झालेल्या छायाचित्रिकरणावरुन आणि छायाचित्रांवरून गुंडगिरी करणार्‍या तरुणांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. आदर्श व आंचल भवनाला आग लावणारा जमाव १५ ते २० जणांचा असण्याचीही शक्यता ‘सीआयडी’ने व्यक्त केली आहे.

No comments: