पणजी, दि. २ (प्रतिनिधी)
आज (दि.२) सायंकाळी पावसाने राजधानी पणजीत अचानक जोरदार धडक देऊन लोकांना चिंब भिजवले. यावेळी मांडवी पुलावर वाहनांची बरीच कोंडी झाली. तर, पणजी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे पालिकेने मान्सूनपूर्व केलेल्या कामाची ‘पोल खोलली’ आहे. मान्सूनने कर्नाटकातील उडपी जिल्ह्यापर्यत धडक दिली असून येत्या दोन दिवसांत पावसाचे गोव्यात आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उकाड्यामुळे हैराण झालेल्या सर्वांनाच या पर्जन्यधारांनी दिलासा दिला. नेमके कार्यालय सुटण्याच्या वेळीच हा पाऊस आल्याने अनेकांनी भिजतच घरी जाणे पसंत केले. तर दुसरीकडे अद्यापही छत्री-रेनकोट आदी सामग्री बाळगली नसल्याने या पहिल्या शिडकाव्यामुळे काही नागरिकांची तारांबळ उडाली.
याआधी २९ मे रोजी मान्सून अंदमान आणि केरळमध्ये दाखल झाला. एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी मान्सून दाखल होण्याची ही अतिशय दुर्मिळ वेळ. मात्र या घटनेमुळे ६ जून दरम्यान मान्सून गोव्यात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Friday, 3 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment