Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 29 May 2011

पर्रीकरांच्या आव्हानानंतर पणजीतील कचरा उचलला

सत्ताधारी गटात फूटीची शक्यता


पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)
महापालिकेतील सत्ताधारी मंडळाने राजीनामे सादर करून दाखवावे; भाजप समर्थक गट सत्तेची सूत्रे हातात घेऊन कचर्‍याचा प्रश्‍न त्वरित निकालात काढेल, असे आव्हान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिले असतानाच सत्ताधारी गटाचे ‘गॉडफादर’ बाबूश मोन्सेरात यांच्या सामूहिक राजीनाम्याच्या आदेशाला न जुमानण्याचा निर्णय काही नगरसेवकांनी घेतला आहे. आज संध्याकाळी अचानक पणजीतील कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले असून सत्ताधारी गटात फूट पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज संध्याकाळी पणजी महानगरपालिकेतर्फे काही भागांतील कचरा उचलण्याचे काम सुरू झाले. हा कचरा नेमका कुठे टाकण्यात येणार आहे या बाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली असली तरी तो परत ताळगाव पठारावरच टाकण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत कचरा समस्येचे खापर सरकारवर फोडून आपल्या समर्थक नगरसेवकांना सोमवारी सामूहिक राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून सत्ताधारी गटात मतभेद निर्माण झाले असून काही नगरसेवकांनी हा आदेश धुडकावून लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
काल कचर्‍याच्या समस्येवर झालेल्या चर्चेवेळी सरकारतर्फे महापालिकेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले, तर मुख्यमंत्री कामत यांनीही सहकार्य देण्याची तयारी दर्शवली होती. महापालिकेतील सत्ताधारी गटाचे दुखणे मात्र वेगळेच आहे. इथे बाबूश मोन्सेरात यांचा डोळा नगरविकास खात्यावर आहे व त्यामुळे कचर्‍याचे राजकारण केले जात असल्याचा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला.
महापौर यतीन पारेख यांना कचरा समस्येवर तोडगा काढणे जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे, असे आवाहनही पर्रीकर यांनी केले. सत्ताधारी गटाने महापालिका निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात कचरा समस्येवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. आता खुद्द सरकार त्यांचे असताना त्यांना हा विषय सोडवता येत नाही काय, असा सवालही पर्रीकर यांनी केला. बाबूश मोन्सेरात हे शिक्षणमंत्री आहेत. ते म्हणजेच सरकार व त्यामुळे सरकारवर टीका करण्याची त्यांची भूमिका हे निव्वळ ढोंग असल्याची टीकाही पर्रीकर यांनी केली.

No comments: